हंसराज,भंडारा :- शिक्षण व्यवस्था, स्पर्धा परीक्षांमधील पारदर्शकता आणि विद्यार्थ्यांच्या समस्यांना वाचा फोडण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सूचनेनुसार भंडारा जिल्ह्यात ‘छात्रों की गूंज’ अभियान राबवण्यात आले. जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजित या कार्यक्रमात तालुक्यातील शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवत आपल्या अडचणी मांडल्या. यावेळी शिक्षण, करिअर आणि मानसिक आरोग्य या विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला राहुल गांधी यांनी राजस्थानमधील कोटा येथे विद्यार्थ्यांशी साधलेल्या संवादाचे प्रक्षेपण करण्यात आले. परीक्षार्थींच्या न्यायासाठी आणि परीक्षा पद्धतीत सुधारणा करण्यासाठी राहुल गांधी यांनी मांडलेली भूमिका यावेळी प्रोजेक्टरद्वारे विद्यार्थ्यांना दाखवण्यात आली. या विचारांना उपस्थित तरुण विद्यार्थ्यांनी टाळ्यांच्या कडकडाटात दाद दिली.
जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मुकुंद साखरकर यांनी यावेळी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला. ते म्हणाले की, “NEET पेपरफुटीसारख्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरले जात आहे. अशा कठीण काळात कोणत्याही विद्यार्थ्याने खचून जाऊ नये किंवा टोकाचे पाऊल उचलून स्वतःचे नुकसान करून घेऊ नये. काँग्रेस पक्ष विद्यार्थ्यांच्या प्रत्येक अन्यायाविरोधात रस्त्यावर उतरून लढण्यास तयार आहे. विद्यार्थ्यांच्या समस्या थेट जाणून घेणे आणि त्यांच्या मनात विश्वासाची भावना निर्माण करणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश आहे.”
भविष्यात शिक्षण, नोकरी भरती किंवा परीक्षांबाबत कोणतीही अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी न घाबरता संपर्क साधावा, असे आवाहनही साखरकर यांनी केले.
‘आकांक्षा’ सारख्या दुर्दैवी घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी विद्यार्थ्यांनी संघटित होऊन आपला आवाज बुलंद करावा, असेही ते म्हणाले.
या संवाद कार्यक्रमाला विकास राऊत, राकेश बिसेन, अक्षत नंदरधने, मंगेश हुमणे, रोहित खोब्रागडे, यश चवडे, दत्ता गिरेपुंजे, पार्थ तिरपुडे, दत्ता गौरी, हिमांशू मेंढे यांच्यासह काँग्रेसचे इतर पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. या अभियानामुळे विद्यार्थ्यांना आपली मते मांडण्यासाठी एक हक्काचे व्यासपीठ मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.




