spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

गणेशपूर ग्रामपंचायतीत ‘मनमानी’चा कारभार; सरपंच, ग्रामविकास अधिकाऱ्यांविरोधात सदस्यांचे बंड

– सदस्यांचा अपमान आणि इतिवृत्तात फेरफार केल्याचा आरोप; गटविकास अधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी

हंसराज,भंडारा :- गणेशपूर ग्रामपंचायतीचा कारभार सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. सरपंच आणि ग्रामविकास अधिकारी हे सदस्यांना विश्वासात न घेता मनमानी पद्धतीने कामकाज करत असल्याचा आरोप करत, ग्रामपंचायतीच्या बहुतांश सदस्यांनी भंडारा पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांकडे धाव घेतली आहे. याप्रकरणी लेखी निवेदन देऊन दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, गणेशपूर ग्रामपंचायतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून लोकप्रतिनिधी आणि प्रशासन यांच्यात ताळमेळ नसल्याचे चित्र आहे. ग्रामविकास अधिकारी हे सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उद्धटपणे उत्तरे देतात, असा आरोप सदस्यांनी केला आहे. “जे बनते ते करा” किंवा “माझी बदली करून घ्या” अशा शब्दांत सदस्यांचा अपमान केला जात असल्याचा दावा निवेदनातून करण्यात आला आहे. यामुळे ग्रामपंचायतीच्या कामकाजावर विपरीत परिणाम होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.

इतिवृत्तात नोंदी टाळल्याचा आरोप ग्रामपंचायतीच्या मासिक सभांमध्ये सदस्यांनी मांडलेले महत्त्वाचे विषय, सूचना आणि हरकतींची नोंद सभेच्या इतिवृत्तात  (प्रोसिडिंग) जाणीवपूर्वक घेतली जात नाही, असा गंभीर आरोपही करण्यात आला आहे. सदस्यांच्या मतांकडे दुर्लक्ष करून लोकशाही पद्धतीचे उल्लंघन केले जात असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. कारभारात पारदर्शकता नसल्याने सदस्यांना त्यांचे वैधानिक अधिकार बजावताना अडचणी येत आहेत.

सदस्यांनी या निवेदनावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमानुसार या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करावी आणि संबंधितांना शिस्त  लावण्याबाबत योग्य ती प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी ग्रामपंचायत सदस्यांनी केली आहे. आता या प्रकरणावर गटविकास अधिकारी काय भूमिका घेतात, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

Popular Articles