spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी – पालकमंत्री संजय राठोड

– उत्साहपूर्ण वातावरणात जयंती सोहळा संपन्न

– सामाजिक एकतेचा दिला संदेश

यवतमाळ :- भारतीय इतिहासातील अद्वितीय पराक्रम, अतुलनीय त्याग, राष्ट्रभक्ती आणि सामाजिक बांधिलकी यांचे प्रतीक असलेले महान योद्धा लख्खीशाह बंजारा यांचा त्याग प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी केले.

लख्खीशाह बंजारा यांच्या ४४६ व्या जयंतीनिमित्त शनिवारी यवतमाळ येथील कार्यालयातील सभागृहात आयोजित अभिवादन सोहळा त्यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड होते. प्रसिद्ध कीर्तनकार व उद्बोधनकार राजुदास जाधव हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना पालकमंत्री संजय राठोड म्हणाले की, “लख्खीशाह बंजारा हे केवळ बंजारा समाजाचे नव्हे, तर संपूर्ण भारतीय राष्ट्राच्या इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या शौर्य, दानशूरता, राष्ट्रनिष्ठा आणि मानवसेवेने भारतीय इतिहास समृद्ध केला आहे. त्यांच्या जीवनातून स्वाभिमान, त्याग, एकता आणि राष्ट्रभक्तीची प्रेरणा घेणे ही आजच्या पिढीची नैतिक जबाबदारी आहे.” ते पुढे म्हणाले की, आजच्या तरुणांनी आपल्या गौरवशाली इतिहासाचा सखोल अभ्यास करून महान पूर्वजांचा वैचारिक वारसा जपला पाहिजे. इतिहासाची जाणीव असलेलाच समाज भविष्य घडवू शकतो. त्यामुळे इतिहास, संस्कृती आणि सामाजिक मूल्यांचे संवर्धन ही काळाची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

लख्खीशाह बंजारा यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकताना त्यांनी सांगितले की, इ.स. १६७५ मध्ये शीख धर्माचे नववे गुरु गुरु तेगबहादूर यांना औरंगजेबाच्या आदेशाने दिल्लीतील चांदणी चौक येथे शहीद करण्यात आले. त्या वेळी औरंगजेबाच्या दहशतीमुळे त्यांच्या पार्थिवाला स्पर्श करण्याचे धाडसही कोणी करत नव्हते. अशा जीवघेण्या परिस्थितीत लख्खीशाह बंजारा यांनी अतुलनीय धैर्य दाखवत गुरु तेगबहादूर यांचे धड बैलगाडीत लपवून रायसीना येथील आपल्या निवासस्थानी आणले. संशय टाळण्यासाठी त्यांनी स्वतःचे घर पेटवून दिले आणि त्या अग्नीत गुरु तेगबहादूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले. धर्म, श्रद्धा आणि मानवतेच्या रक्षणासाठी स्वतःच्या सर्वस्वाचा त्याग करणारी ही घटना भारतीय इतिहासातील सर्वोच्च बलिदानांपैकी एक मानली जाते. दिल्लीतील रायसीना परिसरातील संसद भवनासमोरील गुरुद्वारा रकाबगंज साहिब हे त्या ऐतिहासिक घटनेचे स्मृतिस्थळ म्हणून ओळखले जाते. लख्खीशाह बंजारा यांच्या तांड्याचा तत्कालीन रायसीना परिसरात वास्तव्यास असल्याचे अनेक ऐतिहासिक संदर्भांमध्ये नमूद असून आज ज्या ठिकाणी भारताचे संसद भवन दिमाखात उभे आहे. पुढे शीखांचे दहावे गुरु गोविंदसिंह यांनीही त्यांच्या निःस्वार्थ सेवेला आणि अतुलनीय त्यागाला सर्वोच्च गौरव दिल्याचे शीख परंपरेत नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे लख्खीशाह बंजारा हे राष्ट्रीय एकात्मता, धार्मिक सहिष्णुता आणि मानवतेच्या संरक्षणाचे शाश्वत प्रतीक म्हणून आजही स्मरणात असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. टी. सी. राठोड यांनी अध्यक्षीय भाषणात लख्खीशाह बंजारा यांच्या शौर्यगाथा, राष्ट्रनिष्ठा आणि बलिदानाची गौरवपूर्ण कार्याची माहिती दिली. त्यांच्या जीवनकार्यावर अधिक संशोधन, साहित्यनिर्मिती आणि ऐतिहासिक दस्तऐवजीकरण होणे आवश्यक आहे. समाजातील तरुणांनी इतिहासाचे सखोल अध्ययन करून सामाजिक नेतृत्व स्वीकारावे आणि आपल्या गौरवशाली परंपरेचा अभिमानाने प्रसार करावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात युवकांनी शिक्षण, संघटन आणि समाजसेवा या त्रिसूत्रीच्या माध्यमातून समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रगतीसाठी कार्य करण्याचा निर्धार व्यक्त केला. महिला, युवक आणि विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग हा कार्यक्रमाचे विशेष आकर्षण ठरला. विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी एकाच व्यासपीठावर येऊन समाजहितासाठी संयुक्तपणे कार्य करण्याची शपथ घेताना दिसले. राजकीय आणि वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून समाजबांधव मोठ्या संख्येने एकत्र आल्याने हा जयंती सोहळा समाजएकतेचे ऐतिहासिक उदाहरण ठरल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

समारोपाच्या वेळी सर्व उपस्थितांनी लख्खीशाह बंजारा यांच्या विचारांचा व्यापक प्रसार करण्याचा, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचा, सामाजिक ऐक्य अधिक दृढ करण्याचा आणि राष्ट्रहिताला सर्वोच्च स्थान देण्याचा* सामूहिक संकल्प केला. लख्खीशाह बंजारा यांचा त्याग हा समाजाच्या स्वाभिमानाचा, राष्ट्रीय एकात्मतेचा आणि राष्ट्रभक्तीचा अमर संदेश आहे,” त्यांच्या जीवनकार्याचा आदर्श भावी पिढीपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन करण्यात आले. भविष्यातही अशाच इतिहास-जागर उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षाही व्यक्त केली.

या कार्यक्रमाला सर्व स्तरांतील नागरिक, युवक-युवती, माता-भगिनी, विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक तसेच विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आणि आभार प्रदर्शन प्रा. राजेश चव्हाण यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी धुपचंद राठोड, प्रा. डी. एस. चव्हाण, दिनेश राठोड, देविदास राठोड, संतोष पवार , प्रा. राहुल ठाकुरदास चव्हाण, स्वप्निल राठोड, नितीन राठोड आणि अमोल जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles