spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

स्मार्ट (ToD) मीटरबाबतचे गैरसमज दूर करण्यासाठी महावितरणचे ग्राहक मेळावे; तक्रारींचे होणार जागेवरच निराकरण

नागपूर :- महावितरणच्या नागपूर परिमंडळांतर्गत स्मार्ट (ToD) मीटरबाबत वीज ग्राहकांमध्ये पसरलेले गैरसमज दूर करण्यासाठी आणि मीटर संदर्भातील तक्रारींचे तत्काळ निराकरण करण्यासाठी येत्या बुधवारी, 8 जुलै रोजी उपविभागनिहाय ग्राहक मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मागील काही दिवसांपासून समाज माध्यमांवर (सोशल मीडिया) स्मार्ट मीटरच्या कार्यपद्धतीबाबत काही चुकीची माहिती आणि अफवा पसरवल्या जात आहेत. या संदर्भात ग्राहकांनी कोणताही संभ्रम न ठेवता, अधिकृत माहितीसाठी या मेळाव्यांना उपस्थित राहावे, असे आवाहन महावितरणतर्फे करण्यात आले आहे.

महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, स्मार्ट (ToD) मीटर हे पूर्णतः तांत्रिकदृष्ट्या अचूक असून ते सामान्य वीज ग्राहकांसाठी अत्यंत फायदेशीर आहेत. हे मीटर ग्राहकांना दिवसा सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वीज वापरावर प्रति युनिट 85 पैशांची सवलत मिळवून देत आहेत. मात्र, सोशल मीडियावर काही व्यक्तींकडून हेतुपुरस्सर दिशाभूल करणारी माहिती प्रसारित केली जात आहे, ज्याचा उद्देश ग्राहकांमध्ये भीती निर्माण करणे हाच आहे. वास्तव पाहता, औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारच्या मीटरचा यशस्वी वापर सुरू आहे. त्यामुळे ग्राहकांनी अशा अफवांवर विश्वास न ठेवता महावितरणच्या अधिकृत सूत्रांवरच विश्वास ठेवावा, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

नागपूर परिमंडळांतर्गत नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील सर्वच उपविभागांमध्ये सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत हे मेळावे पार पडणार आहेत. या मेळाव्यांना संबंधित उपविभाग प्रमुख व तांत्रिक कर्मचारी उपस्थित राहून ग्राहकांच्या मनात असलेल्या शंकांचे निरसन करणार आहेत. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढल्याच्या तक्रारींची याठिकाणीच तांत्रिक तपासणी करून त्यावर योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे. या उपक्रमामुळे ग्राहकांना थेट अधिकार्यांशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध होणार असून, त्यातून पारदर्शकता वाढण्यास मदत होणार आहे.

नागपूर शहर मंडळांतर्गत असलेल्या सिव्हील लाईन्स विभागात मंगळवारी कॉम्प्लेक्स चौक (सदर), इंदोरा चौक (कामठी रोड), गिट्टीखदान चौक (काटोल रोड), रॉयल प्लाझा अपार्टमेंट (प्रभा सिटी, झिंगाबाई टाकळी), गोरेवाडा चौक, दीक्षित नगर (लष्करीबाग), जिंजर मॉलजवळ (जरीपटका). कॉग्रेसनगर विभागात शंकर नगर चौक, गोधनी नगर पंचायत (फेटरी), प्रताप नगर चौक, त्रिमूर्ती नगर चौक, रीजेंट उपविभाग (व्हेरायटी स्क्वेअर, छत्रपती चौक), हुडकेश्वर उपविभाग (बेसा चौक). गांधीबाग विभागात इतवारी (नंगा पुतला चौक, शाहिद चौक, टेलिफोन एक्सचेंज चौक), वर्धमान नगर उपविभाग, शांतीनगर शाखा कार्यालय, पारडी/सुभानगर उपविभाग, बिनाकी उपविभाग. महाल विभागात तुकोडजी पुतळा (मानेवाडा), नरेंद्र नगर चौक, सुभेदार उपविभाग, वाठोडा उपविभाग, एसटी स्टँड चौक, रामना मारोती चौक. तर बुटीबोरी विभागात हिंगणा (राय नगर), नगर पंचायत बुटीबोरी चौक, एमआयडीसी-1 (रॉयल पार्क, वैभवनगर ढाबा), एमआयडीसी-2 (ग्रामपंचायत निलडोह) या ठिकाणी तर नागपूर ग्रामिण मंडळातील सर्व 99 शाखा कार्यालयांमध्ये या ग्राहक मेळाव्यांचे आयोजन बुधवार दि. 8 जुलै रोजी सकाळी 9 ते दुपारी 2 या वेळेत करण्यात आले आहे.

स्मार्ट मीटरचे फायदे समजल्यानंतर परिमंडळातील हजारो ग्राहकांनी स्वेच्छेने हे मीटर बसविण्यासाठी अर्ज केले आहेत. या ग्राहकांना ‘महा ऊर्जा मित्र’ मोबाईल ॲपवर आपल्या वीज वापराचा रिअल-टाइम तपशील पाहता येत असल्याने, त्यांना वीज वापर नियंत्रित करून बिलात बचत करणे शक्य झाले आहे. आतापर्यंत नागपूर परिमंडळात एकूण 7 लाख 51 हजार 682 स्मार्ट (ToD) मीटर बसविण्यात आले आहेत, ज्यात नागपूर जिल्ह्यातील 6 लाख 1 हजार 862 आणि वर्धा जिल्ह्यातील 1 लाख 49 हजार 820 मीटरचा समावेश आहे. हे सर्व ग्राहक आता सकाळी 9 ते सायंकाळी 5 या वेळेत वापरलेल्या वीजेवर 85 पैसे प्रति युनिट सवलतीचा लाभ घेत आहेत.

मेळाव्या व्यतिरिक्तही, स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा वाढीव वीजबिलांबाबत कोणालाही काही शंका असल्यास, त्यांनी महावितरणच्या www.mahadiscom.in या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी किंवा महावितरण मोबाईल ॲपचा वापर करावा. याव्यतिरिक्त 1912, 19120, 1800-212-3435 किंवा 1800-234-35 या 24 तास उपलब्ध असलेल्या टोल फ्री क्रमांकांवर संपर्क साधून तक्रार नोंदवण्याचे आवाहन महावितरणने केले आहे. अफवांना थारा न देता ग्राहकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असेही महावितरणने पुन्हा एकदा स्पष्ट केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.