spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

रेतीघाट, धरण आणि अचानक पाणी विसर्गामुळे ढीवर समाजावर तिहेरी संकट; विदर्भ युवा क्रांती संघटनेचा आठ दिवसांचा अल्टिमेटम

हंसराज,भंडारा पवनी :- गोसे धरणाचे २७ दरवाजे सुमारे अर्धा मीटर उघडून अचानक मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने पवनी तालुक्यातील नदीकाठावरील शेकडो ढीवर समाजाच्या मासेमारांचे डोंगे, मासेमारीची जाळी, दोरखंड व इतर साहित्य वाहून जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या घटनेचा फटका विलम सावरला, भोजापूर, धानोरी, कोंदुर्ली, ईसापूर, उमरी, पौना, शिवनाळा, मांगली, जुनोना, कुर्जा, मेंढा, कोरंभी व पवनी परिसरातील मासेमारांना बसला आहे.

या पार्श्वभूमीवर विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक व अध्यक्ष हर्षल दुर्योधन वाघमारे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या निवेदनात गोसे धरणामुळे पारंपरिक मासेमारी व्यवसाय जवळपास संपुष्टात आल्याचा, तसेच शासनाने नदीपात्रातील २४ रेतीघाटांचा लिलाव करून मंजूर क्षमतेपेक्षा अधिक रेती उपसा झाल्याने नदीकाठाची धूप वाढून ढीवर समाजाची घरे व वस्त्या धोक्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, आज ढीवर समाजाच्या रोजगार, निवारा आणि उपजीविका या तीनही मूलभूत गरजा धोक्यात आल्या असून अनेक कुटुंबांसमोर जगण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

संघटनेने प्रशासनाकडे तातडीने संयुक्त पंचनामे, नुकसानग्रस्त मासेमारांना आर्थिक मदत, डोंगे व मासेमारी साहित्याची नुकसानभरपाई, धूपग्रस्त वस्त्यांचे पुनर्वसन, २४ रेतीघाटांवरील अतिरिक्त रेती उपशाची उच्चस्तरीय चौकशी, तसेच गोसे धरणग्रस्त ढीवर समाजासाठी स्वतंत्र पुनर्वसन व कायमस्वरूपी रोजगार योजना जाहीर करण्याची मागणी केली आहे.

यासंदर्भात विदर्भ युवा क्रांती संघटनेने शासनाला आठ दिवसांचा अल्टिमेटम दिला असून, निर्धारित मुदतीत ठोस निर्णय न झाल्यास ढीवर समाजासह लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.

Popular Articles