spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भंडाऱ्यात ओबीसींचे ‘भीक मांगो’ आंदोलन

– महाज्योती आणि सारथी संस्थांमधील विद्यार्थी संख्या घटवल्याने नागरिक आक्रमक

हंसराज, भंडारा :- राज्य सरकारने निधीच्या कमतरतेचे कारण देत महाज्योती, सारथी, बार्टी आणि आर्टी या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी कपात केल्याच्या निषेधार्थ ओबीसी संघर्ष समितीने ६ जुलै रोजी ‘भीक मांगो’ आंदोलन केले. शहरातील त्रिमूर्ती चौक परिसरातून हा मोर्चा काढण्यात आला होता. सरकारच्या या धोरणामुळे ओबीसी, अनुसूचित जाती आणि जमाती प्रवर्गातील विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहतील, असा दावा आंदोलकांनी केला आहे.

आंदोलनकर्त्यांनी हातात कटोरे घेऊन ‘शासनासाठी भीक द्या हो… भीक द्या’ अशा घोषणा देत लोकांकडे पैसे मागितले. मुस्लिम लायब्ररी चौक, बसस्थानक परिसर, तहसील आणि पंचायत समिती परिसरातील नागरिक व दुकानदारांकडून यावेळी एकूण २,२१२ रुपये गोळा झाले. ही रक्कम जिल्हाधिकाऱ्यांनी स्वीकारण्यास नकार दिल्याने ती मनीऑर्डरद्वारे शासनाला पाठवण्यात आल्याची माहिती समितीच्या वतीने देण्यात आली.

आंदोलकांनी दिलेल्या माहितीनुसार, पीएचडीसाठी मिळणाऱ्या अधिछात्रवृत्तीमध्ये ९२.३ टक्के कपात करण्यात आली असून पूर्वीच्या १,३०० विद्यार्थ्यांऐवजी आता केवळ १०० विद्यार्थ्यांनाच लाभ दिला जाणार आहे. तसेच केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षार्थींची संख्या २ हजारांवरून ४००, तर राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी)  प्रशिक्षणार्थींची संख्या ४ हजारांवरून १ हजारापर्यंत कमी करण्यात आली आहे.

यावेळी आंदोलकांनी राज्य आणि केंद्र सरकारवर सडकून टीका केली. केंद्र सरकारने अद्याप राजपत्रात ओबीसींसाठी स्वतंत्र कॉलम तयार केला नसल्याचा आणि लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण व निधीचा वाटा मिळत नसल्याचा आरोप करण्यात आला. या आंदोलनात सदानंद इलमे, प्रभाकर वैरागडे, भगीरथ धोटे, बाळकृष्ण सार्वे, मंगला वाडीभस्मे, ललिता देशमुख, शुभदा झंझाड, वृंदा गायधने, अनिता बोरकर, रोशन उरकुडे, विष्णुदास जगनाडे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Popular Articles