spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडाऱ्यात ‘एमडी’ ड्रग्जची विक्री करणाऱ्या टोळीवर मकोका; मुख्य सूत्रधारासह तिघांवर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पुढाकाराने ‘नंदनवन’ टोळीचा पर्दाफाश

– १३ लाखांचा मुद्देमाल जप्त

हंसराज,भंडारा: भंडारा शहरामध्ये एम.डी. ड्रग्जची तस्करी आणि विक्री करणाऱ्या कुख्यात ‘नंदनवन’ टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मकोका) अंतर्गत मोठी कारवाई केली आहे. टोळी प्रमुख कपिल गंगाधर खोब्रागडे (४१, मूळ रा. नंदनवन, नागपूर, सध्या रा. आंबेडकर वॉर्ड, भंडारा) याच्यासह त्याच्या टोळीतील सदस्य मोहम्मद तरबेज मोहम्मद नवाज शेख (३६, रा. नागपूर) आणि विनय कुमार (फरार) यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, कपिल खोब्रागडे हा नागपूर शहरातील लकडगंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या एका गुन्ह्यात फरार होता. स्वतःची अटक टाळण्यासाठी त्याने भंडारा येथील आंबेडकर वॉर्डात भाड्याने खोली घेतली होती आणि तिथूनच तो एम.डी. ड्रग्ज विक्रीचा व्यवसाय चालवत होता. ८ मे २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी या खोलीवर छापा टाकला. या कारवाईत ६३ ग्रॅम २९० मिली ग्रॅम एम.डी. ड्रग्ज पावडर, ७९ हजार ९६० रुपये रोख आणि इतर साहित्य असा एकूण १३ लाख ४७ हजार २६० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला होता. या प्रकरणी या प्रकरणी भंडारा पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक १०५७/२०२६, कलम ८ (क), २२ (क), २९ एन.डी.पी.एस. ॲक्ट नुसार ९ मे २०२६ रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.

पोलीस तपासात समोर आले की, टोळी प्रमुख कपिल खोब्रागडे याच्यावर २०२४ पासून नागपूर आणि भंडारा जिल्ह्यांत अंमली पदार्थ तस्करीचे एकूण ५ गुन्हे दाखल आहेत. या टोळीने आपले वर्चस्व निर्माण करण्यासाठी आणि आर्थिक लाभासाठी संघटितपणे गुन्हे करणे सुरूच ठेवले होते. प्रतिबंधात्मक कारवाई करूनही त्यांच्या गुन्हेगारी प्रवृत्तीत बदल झाला नसल्याचे पाहून जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी या टोळीविरुद्ध मकोका अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव तयार करण्याचे आदेश दिले.

पोलीस निरीक्षक उल्हास भुसारी यांनी तयार केलेला हा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. ७ जुलै २०२६ रोजी विशेष पोलीस महानिरीक्षकांनी या प्रस्तावाला मंजुरी दिली असून, आता या गुन्ह्यात मकोका कायद्याच्या कलमांची वाढ करण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, भंडारा पोलीस ठाण्याचे निरीक्षक उल्हास भुसारी आणि त्यांच्या पथकाने केली. जिल्ह्यातील अंमली पदार्थ विक्री करणाऱ्या इतर टोळ्यांचाही शोध सुरू असून पोलीस प्रशासन अशा गुन्हेगारांविरुद्ध कडक पावले उचलत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.