संदीप कांबळे, कामठी तालुका वार्तापत्र
कामठी :- देश विकासाच्या दिशेने झपाट्याने वाटचाल करीत असताना कामठी तालुक्यातील येरखेडा नगरपंचायतीत आजही नागरिकांना मृत्यूनंतर सन्मानाने अंत्यसंस्कार करण्यासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याचे वास्तव समोर आले आहे. नागपूर जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत म्हणून ओळख असलेल्या येरखेडा गावाला वर्षभरापूर्वी नगरपंचायतीचा दर्जा मिळाला. मात्र दर्जावाढीनंतरही स्मशानभूमी व घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न कायम असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
राज्याचे महसूल मंत्री तथा नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्यक्षेत्रातील येरखेडा नगरपंचायतीत आजही स्वतंत्र स्मशानभूमी उपलब्ध नाही. त्यामुळे गावातील मृत व्यक्तींवर अंत्यसंस्कार करण्यासाठी नागरिकांना रणाळा किंवा आजनी मोक्षधाम येथे जावे लागते. मृत्यूच्या दुःखातही नातेवाईकांना अतिरिक्त आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत असल्याची खंत नागरिकांनी व्यक्त केली आहे.
येरखेडा नगरपंचायतीत घनकचरा व्यवस्थापनासाठी स्वतंत्र डम्पिंग यार्ड नसल्याने गावात अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग साचत आहेत. त्यामुळे दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या समस्या निर्माण होत असून स्वच्छतेचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, गावाचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला असला तरी स्मशानभूमीसाठी जागा निश्चित करणे, आवश्यक निधी उपलब्ध करून देणे आणि मूलभूत सुविधा उभारण्याबाबत प्रशासनाकडून अद्याप ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. परिणामी हा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबितच आहे.
येरखेडा नगरपंचायतीत स्वतंत्र स्मशानभूमी उभारून तेथे अंतर्गत रस्ता, शेड, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, वीज, संरक्षण भिंत तसेच आवश्यक इतर सुविधा तातडीने उपलब्ध करून द्याव्यात. तसेच घनकचरा व्यवस्थापनासाठी आधुनिक डम्पिंग यार्ड उभारून स्वच्छतेचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
“जन्माप्रमाणेच मृत्यूनंतरही प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने निरोप मिळणे हा त्याचा मूलभूत मानवी हक्क आहे. त्यामुळे येरखेडा नगरपंचायतीतील स्मशानभूमी व घनकचरा व्यवस्थापनाचा प्रश्न तातडीने मार्गी लावून नागरिकांना दिलासा द्यावा,” अशी एकमुखी मागणी येरखेडा येथील नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.




