spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

क्रीडा संकुल अन् टेबल टेनिस कोर्टची कामे निर्धारित वेळेत पूर्ण करा

– क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांनी केली कामाची पाहणी

नागपूर :- रामदासपेठ येथील नागपूर महानगरपालिकेच्या मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल उभारण्याचे काम वेगाने सुरू असून, या प्रकल्पाची मनपाच्या क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड यांनी गुरुवारी (ता. ९) पाहणी केली. तसेच त्यांनी प्रतापनगर येथील शांतिनिकेतन मैदानावर सुरू असलेल्या टेबल टेनिस कोर्टाच्या उभारणीच्या कामाचाही आढावा घेतला. दोन्ही प्रकल्पांची कामे गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

यावेळी उपायुक्त मंगेश खवले, क्रीडा अधिकारी डॉ. पियुष आंबुलकर, उपअभियंता गजानन वराडे, कार्यकारी अभियंता सुनील गजबिये, कनिष्ठ अभियंता सविता गणोरकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

पाहणीदरम्यान सभापती दर्शनी धवड यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच काम गुणवत्तापूर्ण व निर्धारित वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना समिती सभापतींनी यावेळी दिल्या.

रामदासपेठ येथील नागपूर महानगरपालिकेच्या मोर हिंदी उच्च प्राथमिक शाळेच्या जागेवर अत्याधुनिक क्रीडा संकुल या प्रकल्पाअंतर्गत बास्केटबॉल, स्केटिंग, पिकलबॉल कोर्ट तसेच बॅडमिंटनसाठी प्रशस्त वातानुकूलित (एसी) हॉल उभारण्यात येणार आहे. याशिवाय खेळाडू व नागरिकांच्या सोयीसाठी पार्किंग, स्वच्छतागृह तसेच इतर आधुनिक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. शहरातील क्रीडाप्रेमींना दर्जेदार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा प्रकल्प आधुनिक पद्धतीने विकसित केला जात आहे.

तसेच प्रतापनगर येथील शांतिनिकेतन मैदानावर टेबल टेनिस कोर्ट उभारण्याचे कामही प्रगतीपथावर आहे. दोन्ही ठिकाणांची कामे निर्धारित वेळेत पूर्ण होणे अपेक्षित असल्याचे सभापती दर्शनी धवड यांनी सांगितले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.