– १४३ विद्यार्थ्यांनी घेतली बालविवाह प्रतिबंधक शपथ!
गडचिरोली :- जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय अंतर्गत, जिल्हा बाल संरक्षण कक्ष गडचिरोली यांच्या वतीने आज दिनांक ०८ जुलै २०२६ रोजी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा जामगिरी येथे बाल संरक्षण विषयक विशेष माहिती देण्यात आली. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी दीपक बानाइत आणि जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अविनाश गुरनुले यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शाळेतील एकूण १४३ विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून बाल हक्क आणि सुरक्षेविषयीचे महत्त्वपूर्ण ज्ञान जाणून घेतले.
याप्रसंगी मार्गदर्शक तथा जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे क्षेत्र कार्यकर्ता रवींद्र बंडावार यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना बालकांचे हक्क आणि त्यांच्या सुरक्षेविषयी सविस्तर माहिती दिली. यामध्ये प्रामुख्याने बालविवाहाचे दुष्परिणाम व त्यासंबंधित कायद्यातील तरतुदी, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण करणारा पोक्सो कायदा २०१२ (POCSO Act), सुरक्षित स्पर्श व असुरक्षित स्पर्श यातील फरक ओळखून स्वतःचे रक्षण कसे करावे आणि सतर्क कसे राहावे, याविषयी अत्यंत सोप्या भाषेत मार्गदर्शन करण्यात आले. यासोबतच बालकांच्या विकासासाठी व कल्याणासाठी शासनामार्फत राबविल्या जाणाऱ्या विविध शासकीय योजना, आपत्कालीन मदतीसाठी उपलब्ध असलेली चाईल्ड हेल्पलाईन सेवा आणि बालकामगार प्रथेचे उल्लंघन व शिक्षणाचे महत्त्व या विषयांवरही सविस्तर प्रकाश टाकण्यात आला. सर्व १४३ उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि अंगणवाडी सेविका यांनी मिळून सामूहिक बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली.
या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे मुख्याध्यापक दीपक आत्राम, शिक्षक विद्यानगर मांदाळे, दीपक पुंगाटी, लालदेव कोडापे, तसेच अंगणवाडी सेविका सुनंदा वाढई व सुवर्णा गेडाम यांनी विशेष परिश्रम घेतले. या उपक्रमातून उपस्थित विद्यार्थ्यांना बाल हक्क व सुरक्षेबाबत सविस्तर माहिती देण्यात आली.




