spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पावसाळ्यात बेफिकिरी नको; वाहतूक नियमांचे काटेकोर पालन करा !

– वेगावर नियंत्रण, हेल्मेट-सीट बेल्टचा वापर अनिवार्य; अपघात टाळण्यासाठी नवेगाव बांध पोलिसांचे नागरिकांना आवाहन

पंकज परशुरामकर,इनसाइडर न्युज टुडे प्रतिनिधी

नवेगाव बांध :- पावसाळ्याच्या आगमनानंतर परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रस्ते निसरडे झाले असून अपघाताचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला आहे. अशा परिस्थितीत प्रत्येक वाहनचालकाने अधिक जबाबदारीने वाहन चालवत वाहतुकीच्या नियमांचे काटेकोर पालन करावे, असे आवाहन नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे ठाणेदार अजित पाटील यांनी केले आहे.

पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचणे, खड्डे न दिसणे, चिखलामुळे वाहनांचा तोल जाणे तसेच पावसाच्या सरींमुळे दृश्यमानता कमी होणे, ही अपघातांची प्रमुख कारणे ठरत आहेत. त्यामुळे वाहनाचा वेग नियंत्रित ठेवणे, अचानक ब्रेक न लावणे, धोकादायक ओव्हरटेक टाळणे आणि पुढील वाहनापासून सुरक्षित अंतर राखणे अत्यावश्यक असल्याचे ठाणेदार पाटील यांनी स्पष्ट केले.

दुचाकीस्वारांनी दर्जेदार आयएसआय मानांकित हेल्मेटचा वापर करणे, तर चारचाकी चालक व प्रवाशांनी सीट बेल्ट बांधणे अनिवार्य असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पावसाळ्यात वाहनाचे ब्रेक, टायर, वायपर, हेडलाईट, इंडिकेटर व इतर आवश्यक यंत्रणा सुस्थितीत आहेत की नाहीत, याची खात्री करूनच प्रवास सुरू करावा, असेही त्यांनी नमूद केले.

मोबाईलवर बोलत वाहन चालविणे, मद्यप्राशन करून वाहन चालविणे, वाहतुकीच्या नियमांकडे दुर्लक्ष करणे तसेच निष्काळजीपणे वाहन चालविणे हे अपघातांना निमंत्रण देणारे प्रकार असल्याने नागरिकांनी अशा कृतींपासून दूर राहावे, असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

“आपल्या घरी आपली सुखरूप परतण्याची वाट पाहणारी माणसे आहेत,” याची जाणीव प्रत्येक वाहनचालकाने ठेवावी. स्वतःच्या आणि इतरांच्या जीवाची सुरक्षितता लक्षात घेऊन जबाबदारीने वाहन चालविणे ही प्रत्येकाची नैतिक जबाबदारी आहे. वाहतुकीचे नियम पाळल्यास अनेक अपघात टाळता येऊ शकतात, असा विश्वास ठाणेदार अजित पाटील यांनी व्यक्त केला.

नवेगाव बांध पोलिसांनी “वाहतुकीचे नियम पाळा, अपघाताला आळा घाला” हा जनजागृती संदेश देत पावसाळ्यात सुरक्षित प्रवासाला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले आहे. “सुरक्षित प्रवास, सुरक्षित जीवन” हे ब्रीद अंगीकारून प्रत्येक नागरिकाने वाहतूक शिस्त पाळावी, असेही पोलिस प्रशासनाने नमूद केले आहे.

ठाणेदार अजित पाटील यांचे आवाहन

“पावसाळ्यात वाहन चालविताना घाई न करता संयम आणि सतर्कता बाळगणे आवश्यक आहे. ओल्या रस्त्यावर वेगावर नियंत्रण ठेवावे, वाहतुकीच्या सर्व नियमांचे पालन करावे. दुचाकीस्वारांनी हेल्मेट तर चारचाकी चालकांनी सीट बेल्टचा वापर करावा. प्रत्येकाने जबाबदारीने वाहन चालविल्यास अपघात टाळून स्वतःसह इतरांचाही जीव सुरक्षित ठेवता येईल.”

— अजित पाटील ठाणेदार, पोलीस स्टेशन नवेगाव बांध


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.