spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१५ वर्षीय अल्पवयीनाकडून ५० वर्षीय व्यक्तीची हत्या

– छत्रपती संभाजीनगरात खळबळ; अल्पवयीन आरोपी ताब्यात, जामिनावर असतानाच पुन्हा गंभीर गुन्ह्याचा आरोप

छत्रपती संभाजीनगर :- मुकुंदवाडी परिसरात घरासमोर बसणाऱ्या ५० वर्षीय व्यक्तीची चाकूने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्री घडली. या प्रकरणी पोलिसांनी १५ वर्षीय अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले असून, तो यापूर्वी एका गंभीर गुन्ह्याच्या प्रकरणात जामिनावर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मृताचे नाव रोहिदास दत्तू खकाळ (वय ५०) असे आहे. ते गेल्या काही वर्षांपासून आजारी असल्याने घरीच राहत होते. त्यांच्या पत्नी घरकाम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होत्या. आजारपणामुळे खकाळ हे नेहमी घरासमोरील ओट्यावर बसत असत.

पोलिसांच्या प्राथमिक तपासानुसार, अल्पवयीन आरोपीने शिक्षण अर्धवट सोडल्यानंतर नशेच्या आहारी गेल्याचा संशय आहे. तो परिसरात उघड्यावर बसून नशा करत असल्याने खकाळ यांच्या उपस्थितीमुळे त्याला अडथळा येत होता. या कारणावरून दोघांमध्ये यापूर्वीही वाद झाला होता. सुमारे महिनाभरापूर्वी आरोपीने त्यांना मारहाण केल्याचेही तपासात समोर आले आहे.

बुधवारी रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास आरोपीने खकाळ यांना घराबाहेर बोलावले. त्यानंतर दोघांमध्ये पुन्हा वाद झाला आणि आरोपीने धारदार चाकूने त्यांच्या पोटावर व पाठीवर वार केल्याचा आरोप आहे. गंभीर जखमी झालेल्या खकाळ यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.

घटनेनंतर आरोपी तेथून निघून गेला. माहिती मिळताच मुकुंदवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला. स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी काही वेळातच जिन्सी परिसरातून अल्पवयीन आरोपीला ताब्यात घेतले.

प्राथमिक तपासात परिसरात उघड्यावर नशा करण्यास विरोध होऊ नये आणि नागरिकांमध्ये दहशत निर्माण व्हावी, या उद्देशाने हा गुन्हा केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. तथापि, गुन्ह्यामागील नेमके कारण आणि इतर बाबींचा तपास सुरू असून, न्यायालयीन प्रक्रियेनंतरच त्याबाबत अंतिम निष्कर्ष स्पष्ट होणार आहे.

या घटनेमुळे मुकुंदवाडी, राजनगर आणि संजयनगर परिसरातील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, सार्वजनिक ठिकाणी सुरू असलेल्या बेकायदेशीर कृत्यांवर प्रभावी कारवाईची मागणी नागरिकांकडून होत आहे.

Popular Articles