कामठी :- नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने नवीन कामठी पोलीस ठाणे हद्दीत धाडसी कारवाई करत अवैध देशी बनावटीच्या पिस्तूलासह दोन आरोपींना ताब्यात घेतले. या कारवाईत पिस्तूल, जिवंत काडतूस आणि मोबाईलसह एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची यशस्वी कारवाई काल रात्री 12.30 वाजता कामठी रोड वरील स्वाद ढाब्याजवळ करण्यात आली.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोपनीय माहितीच्या आधारे १० जुलै २०२६ रोजी रात्री १२.३० ते २.५० वाजण्याच्या दरम्यान स्वाद पंजाबी फॅमिली गार्डन ढाब्यासमोरील फुटपाथवर सापळा रचून आरोपीवर यशस्वी रित्या धाड घालण्यात आली या धाडीतून आरोपी मोहम्मद फर्मान मोहम्मद फिरोज शेख (वय २७, बीबी कॉलनी, येरखेडा, नवीन कामठी याच्याकडून एक देशी बनावटीचे लोखंडी पिस्तूल, मॅगझीन आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. तसेच आरोपी शेख हबीब शेख हुसेन (वय ४०, रा. गोंडेगाव, ता. पारशिवनी) यालाही ताब्यात घेत अटक करण्यात आले.
कारवाईदरम्यान ५० हजार रुपये किमतीचे देशी पिस्तूल, १ हजार रुपयांचे जिवंत काडतूस आणि १० हजार रुपयांचा ओप्पो कंपनीचा मोबाईल, असा एकूण ६१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
या प्रकरणी दोन्ही आरोपीविरुद्ध भारतीय हत्यार कायदा कलम ३/२५ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये नवीन कामठी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करणयात आले असून, प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
ही यशस्वी कारवाई पोलीस निरीक्षक भारत क्षीरसागर,सह नागपूर शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.




