– ८३२ तक्रारी प्राप्त ; ४८५ तक्रारींची तपासणी
– १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश
– जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक संपन्न
यवतमाळ :- जिल्ह्यात सोयाबीन बियाणे उगवणीबाबत प्राप्त झालेल्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विकास मीना यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय कृषी निविष्ठा सनियंत्रण समितीची बैठक काल महसूल भवनात संपन्न झाली. बैठकीत शेतकऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत ज्या बियाणे कंपन्यांविरुद्ध उगवणीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या आहेत, त्या कंपन्यांना जबाबदार धरून सर्व तक्रारींचा वेळेत निपटारा करण्याचे कडक निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
जिल्ह्यात आतापर्यंत सोयाबीन बियाणे उगवणीच्या एकूण ८३२ तक्रारी प्राप्त झाल्या असून, नेर, बाभूळगाव आणि दारव्हा या तालुक्यांमध्ये सर्वाधिक तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात सर्वाधिक ४१५ तक्रारी नेर तालुक्यात नोंदविण्यात आल्या असून, त्यानंतर बाभूळगावमध्ये १५६ आणि दारव्हा तालुक्यात १३६ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. कळंबमध्ये ५०, वणीमध्ये १९, यवतमाळमध्ये १३, पुसदमध्ये ११, अर्णीमध्ये ९, घाटंजी व मारेगावमध्ये प्रत्येकी ५, दिग्रसमध्ये ४, पांढरकवडामध्ये ४, उमरखेडमध्ये ३, महागावमध्ये २ तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत. त्यापैकी ४८५ तक्रारींची तालुका तक्रार निवारण समितीने पाहणी पूर्ण केली आहे. ३०२ तक्रारीची पाहणी करण्यात येणार आहे. तक्रारी प्राप्त झालेल्या कंपन्यांच्या बियाण्यांचे नमुने तातडीने घेऊन त्यांचे अहवाल वेळेत प्राप्त करण्याच्या सूचना कृषी विभागाला देण्यात आल्या. नमुने अप्रमाणित आढळल्यास संबंधित कंपन्यांविरुद्ध न्यायालयीन प्रकरणे दाखल करण्याचे निर्देशही जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले.
जिल्ह्यात कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असून, १४ जुलै २०२६ पर्यंत ४,०९० कृषी निविष्ठा दुकानांची तपासणी करण्यात आली आहे. या तपासणीत १५१ कृषी केंद्रांना विक्री बंदचे आदेश देण्यात आले असून ३८ परवाने निलंबित करण्यात आले आहेत. तसेच १५ परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आले असून ८ प्रकरणांमध्ये पोलीस गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
या बैठकीस जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी मनोजकुमार ढगे, कृषि विकास अधिकारी लहू आडे, मोहीम अधिकारी प्रवीण जाधव, जिल्हा गुणनियंत्रण अधिकारी धीरज मोहेकर, तसेच यवतमाळ जिल्ह्यातील कृषी विक्रेते आणि विविध बियाणे कंपन्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते.








