नागपूर :- मोरया फाउंडेशनच्या वतीने समाजातील ज्येष्ठ नागरिकांचा गौरव करण्याच्या उद्देशाने अमरनगर समाज भवन, हनुमान मंदिर, चिखलीचा राजा रोड येथे भव्य ज्येष्ठ नागरिक सत्कार सोहळा तसेच बाल नृत्य स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार मोहन मते, परिवहन समितीच्या सभापती मंगला खेकरे, माजी नगरसेवक बाबाराव तायडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे मुकेश रेवतकर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यानंतर उपस्थित मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी माऊली ग्रुपने गजानन महाराजांचे स्तोत्रपठण सादर करून वातावरण भक्तिमय केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक रजनी अविनाश चौहान यांनी केले. यावेळी आमदार मोहन मते यांनी मोरया फाउंडेशनच्या सामाजिक उपक्रमांचे कौतुक करत संस्थेच्या भावी कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यानंतर उपस्थित ज्येष्ठ नागरिकांचा शाल, श्रीफळ व रोपटे देऊन सन्मान करण्यात आला. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या बाल नृत्य स्पर्धेत लहानग्यांनी विविध सांस्कृतिक सादरीकरणातून आपली कला सादर करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेतील विजेत्यांना तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना मोरया फाउंडेशनचे अध्यक्ष अविनाश चौहान आणि शिवसेनाचे नगरसेवक सूरज गोजे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र व बक्षिसांचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमास ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांसाठी आयोजित भोजनाने करण्यात आली.



