हंसराज,भंडारा :- भंडारा जिल्ह्यात चोरी आणि घरफोडीच्या गुन्ह्यांनी धुमाकूळ घालणाऱ्या कुख्यात ‘महिलांगे’ टोळीच्या मुसक्या आवळण्यात भंडारा जिल्हा पोलिसांना मोठे यश आले आहे. या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारी कारवायांना पायबंद घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन यांनी कठोर पाऊल उचलत, टोळीचा प्रमुख नरेश महिलांगे आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध ‘मकोका’ (महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा) अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या कारवाईमुळे जिल्ह्यातील सराईत गुन्हेगारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार गेल्या अनेक महिन्यांपासून भंडारा, नागपूर आणि गोंदिया जिल्ह्यांत घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली होती. तपासादरम्यान ‘महिलांगे’ टोळीचे नाव समोर आले. या टोळीने ११ एप्रिल २०२६ रोजी पवनी तालुक्यातील कोसरा येथील तक्रारदार नंदराम सोनकुसरे यांच्या बंद घराचे खिडकीचे गज कापून आत प्रवेश केला होता. कपाटातील १४ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ३२ हजार रुपयांची रोकड असा ऐवज चोरून ही टोळी पसार झाली होती. याप्रकरणी अड्याळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०५ (अ), ३३१ (४) अन्वये गुन्हा नोंदवण्यात आला होता. टोळी प्रमुख नरेश अंकालु महिलांगे (वय ३२, रा. डिप्टी सिग्नल, पुजाराम वाडी, कळमना, नागपूर), टोळी सदस्य मुकेश रघुनाथ जांभूळकर (रा.आदर्श नगर झोपडपट्टी, राणी दुर्गावती चौक, नागपूर). ही टोळी बंद घरांची रेकी करून, घराचे कुलूप किंवा कडा तोडून तसेच खिडकीचे गज कापून चोरी करण्यात पटाईत आहे.
तपासात धक्कादायक माहिती समोर आली आहे की, या टोळीवर २०१६ पासून नागपूर शहर, नागपूर ग्रामीण, गोंदिया, भंडारा (अड्याळ, आंधळगाव) आणि शेजारील छत्तीसगड राज्यात चोरी व घरफोडीचे तब्बल ७६ गंभीर गुन्हे दाखल आहेत. यापूर्वी या टोळीवर तडीपार आणि एम.पी.डी.ए. (MPDA) सारख्या प्रतिबंधक कारवाया करण्यात आल्या होत्या. मात्र, जामिनावर सुटताच ही टोळी पुन्हा नवीन सदस्य जोडून गुन्हेगारी कृत्य करत होती. समाजात दहशतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या या टोळीवर कायमस्वरूपी वचक बसवण्यासाठी ‘मकोका’ लावणे आवश्यक होते. अड्याळ पोलीस स्टेशनचे ठाणेदार सचिन तायवडे यांनी या टोळीविरुद्ध मकोकाचा प्रस्ताव तयार केला होता. हा प्रस्ताव नागपूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांच्याकडे मंजुरीसाठी पाठवण्यात आला होता. प्रस्तावाचा सखोल अभ्यास करून १८ जुलै २०२६ रोजी या टोळीवर मकोका लावण्यास मंजुरी देण्यात आली.
ही धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संजय गायकवाड, अड्याळचे पोलीस निरीक्षक सचिन तायवडे आणि त्यांच्या पथकातील अंमलदारांनी यशस्वीरीत्या पार पाडली. भंडारा जिल्हा पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, जिल्ह्यातील संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी अशाच प्रकारच्या कठोर कारवाया यापुढेही सुरू राहतील.




