spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

भंडारा शहरात खड्ड्यांचे साम्राज्य; खासदार प्रशांत पडोळे उतरले रस्त्यावर लायब्ररी चौकात वाहन अडकल्याने नगर परिषद प्रशासनाच्या कारभारावर संताप व्यक्त

हंसराज भंडारा :–  शहरातील मुख्य लायब्ररी चौक परिसरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, आज या भागात एक वाहन मोठ्या खड्ड्यात अडकल्याची घटना घडली. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले असून, परिस्थितीची माहिती मिळताच भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे खासदार प्रशांत पडोळे यांनी भर पावसात घटनास्थळी  धाव घेत रस्त्यांची पाहणी केली. शहरातील भूमिगत आणि भुयारी गटार योजनेच्या कामामुळे अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवल्याने खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाले असून, यामुळे अपघातांचा धोका वाढल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

दिक्षा समितीच्या बैठकीत प्रशासनाकडून शहरात खड्डे नसल्याचा दावा करण्यात आला होता, मात्र प्रत्यक्ष परिस्थिती या दाव्याच्या उलट असल्याचे दिसून येत आहे. लायब्ररी चौकासह शास्त्री चौक, खाम तलाव, खात रोड, शीतला माता मंदिर परिसर, राजीव गांधी चौक, तकिया, लक्ष हॉस्पिटल, नागपूर नाका रस्ता, जे एम पटेल, बसस्थानक, जिल्हा सामान्य रुग्णालय आणि पोस्ट ऑफिस चौक परिसरातील रस्त्यांची चाळण झाली आहे. पहिल्याच पावसात रस्त्यांच्या कामाची प्रत उघडी पडली असून, खड्डे दुरुस्तीसाठी वापरल्या जाणाऱ्या निधीच्या विनियोगाबाबतही नागरिकांकडून संशय व्यक्त केला जात आहे.

प्रशांत पडोळे यांनी यावेळी नगर परिषद प्रशासनाच्या आणि संबंधित अभियंत्यांच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रस्ते आणि खड्डे दुरुस्तीच्या नावाखाली निधीचा गैरवापर होत असल्याची तक्रार करत, या संपूर्ण प्रकरणाची आणि संबंधित अभियंत्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. नगर परिषदेचे मुख्याधिकारी एसी केबिनमधून बाहेर पडून प्रत्यक्ष परिस्थितीची पाहणी करत नसल्याचा आरोप करत, तातडीने हे जीवघेणे खड्डे न बुजविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला.

प्रशासनाने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन तातडीने रस्ते दुरुस्तीचे काम हाती न घेतल्यास भंडारा शहरातील जनतेच्या रोषाला सामोरे जावे लागेल, असेही पडोळे यांनी नगर परिषद प्रशासनाला बजावले आहे. या गंभीर परिस्थितीनंतर आता नगर परिषद प्रशासन रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण भंडारावासीयांचे लक्ष लागले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.