spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

गणेशपूर रेल्वे क्रॉसिंगच्या मागणीसाठी खासदारांना निवेदन दवडीपार बेला येथील ट्रान्सफॉर्मर स्थलांतरित करण्याची जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांची मागणी

हंसराज भंडारा :- भंडारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हा कार्यालयात १७ जुलै २०२६ रोजी आयोजित जिल्हा कार्यकारिणीच्या बैठकीत जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांनी नवनिर्वाचित खासदार राजेंद्र जैन यांना विविध समस्यांबाबत निवेदन दिले. या निवेदनात प्रामुख्याने गणेशपूर येथील रेल्वे क्रॉसिंग आणि दवडीपार बेला येथील ट्रान्सफॉर्मरच्या प्रश्नांकडे लक्ष वेधण्यात आले. गणेशपूर ही जिल्ह्यातील मोठी ग्रामपंचायत असून, गाव भंडारा रोड ते जवाहरनगर डिफेन्स सायटिंग रेल्वे लाईनमुळे दोन भागात विभागले गेले आहे. सध्या रेल्वे विभागाने या ठिकाणची रेल्वे पटरी काढून घेतली असून तिथे संरक्षक भिंतीचे काम सुरू आहे. मात्र, गणेशपूर ग्रामपंचायत ते मते दूध डेअरी मार्गे हायवेकडे जाणारा रस्ता हा गावकऱ्यांच्या दळणवळणाचा मुख्य मार्ग आहे.

या मार्गावरील रेल्वे पोल क्रमांक १०७९/१७ ओएफ-१८ ओएफ दरम्यान रेल्वेच्या जागेतून अधिकृत रेल्वे क्रॉसिंग मंजूर करण्याची मागणी करण्यात आली आहे. अधिकृत क्रॉसिंग मिळाल्यास स्थानिक स्वराज्य संस्थेला तिथे अद्यावत रस्ता आणि इतर सोयी-सुविधा निर्माण करणे सोपे होईल, असे निवेदनात नमूद केले आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वे सहाय्यक मंडळ अभियंता तुमसर रोड यांच्या अधिपत्याखाली आणि भंडारा रोड रेल्वे स्टेशनच्या नियंत्रणात असलेले हे क्रॉसिंग मंजूर करून मिळावे, अशी विनंती खासदार राजेंद्र जैन यांना करण्यात आली आहे. यासोबतच मौजा दवडीपार बेला येथील जिल्हा नियोजन समितीमार्फत विशेष बाब म्हणून नवीन कृषी ट्रान्सफॉर्मर मंजूर करून देण्याबाबतही निवेदन देण्यात आले. दवडीपार बेला नालालगत असलेल्या जैन डेअरी कारखान्याच्या संरक्षक भिंतीला लागून कृषी पंपांना वीज पुरवठा करणारा ट्रान्सफॉर्मर आहे. हा ट्रान्सफॉर्मर बॅकवॉटरमुळे पाण्याखाली गेल्याने तो तातडीने वरच्या भागात स्थलांतरित करणे आवश्यक झाले आहे. यासाठी जिल्हा नियोजन समितीमार्फत विशेष निधी उपलब्ध करून देण्याची मागणी यशवंत सोनकुसरे यांनी केली आहे.

निवेदन देताना जिल्हा परिषद सदस्य यशवंत सोनकुसरे यांच्यासह पंचायत समिती सदस्य कीर्ती गणवीर, राष्ट्रवादी कलाकार समितीचे राज्य पदाधिकारी महेंद्र वाहने, गणेशपूर ग्रामपंचायत पदाधिकारी हर्षा कराडे, राधिका भुरे, घोनमोडे, दुपारे आणि चोपकर उपस्थित होते. या दोन्ही समस्यांवर तातडीने तोडगा काढण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि जिल्हा नियोजनकडून पाठपुरावा करण्याची विनंती यावेळी करण्यात आली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.