हंसराज,भंडारा :- राज्य निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार, महाराष्ट्रभर ३० जून ते ८ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ‘विशेष संक्षिप्त पुनरिक्षण (SIR)’ मोहीम राबवली जात आहे. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने २० जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भंडारा जिल्ह्याने या मोहिमेत महत्त्वपूर्ण प्रगती केली असून जिल्ह्यात ९७ टक्क्यांहून अधिक मतदार गणना अर्जांचे (EFs) वाटप पूर्ण झाले आहे.
बीएलओंची सक्रिय कामगिरी भंडारा जिल्ह्यात ही मोहीम राबवण्यासाठी एकूण १,१६७ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) नियुक्त करण्यात आले आहेत. ३० जून २०२६ पर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यात एकूण १० लाख १० हजार ७८८ मतदार आहेत. या सर्व मतदारांपर्यंत पोहोचण्याचे उद्दिष्ट समोर ठेवून बीएलओंनी आतापर्यंत ९ लाख ८४ हजार ०४३ अर्जांचे यशस्वीपणे वितरण केले आहे. वितरणाची ही टक्केवारी ९७.३५% इतकी असून, राज्याच्या सरासरीच्या तुलनेत जिल्ह्याची कामगिरी समाधानकारक आहे.
डिजिटायझेशनचे कामही वेगात केवळ अर्जांचे वाटपच नव्हे, तर गोळा झालेल्या माहितीचे संगणकीकरण (Digitization) करण्याचे कामही जिल्हा प्रशासनाकडून युद्धपातळीवर सुरू आहे. आतापर्यंत ६ लाख ३२ हजार १०२ अर्जांचे संगणकीकरण पूर्ण झाले आहे, म्हणजेच ६२.५४% काम पूर्ण झाले आहे.
८ ऑगस्टपर्यंत मोहीम सुरू राहणार मतदार यादीतील त्रुटी दूर करणे, दुबार नावे वगळणे आणि नवीन पात्र मतदारांची नोंदणी करणे हा या मोहिमेचा मुख्य हेतू आहे. ही मोहीम ८ ऑगस्ट २०२६ पर्यंत चालणार असून, उर्वरित मतदारांचे अर्ज गोळा करून त्यांचे शंभर टक्के संगणकीकरण करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व यंत्रणा या कामात गुंतली आहे.





