हंसराज,भंडारा साकोली :- साकोली तालुक्यातील मौजा वडेगाव ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या शंकरपूर येथील मिनी अंगणवाडी केंद्रातील मदतनीस पदभरतीचा वाद आता अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात या प्रकरणाची अंतिम सुनावणी नुकतीच पार पडली असून, न्यायालयाने आपला निकाल राखून ठेवला आहे. या निकालाकडे आता संपूर्ण साकोली तालुक्यासह भंडारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
प्रकरणाची पार्श्वभूमी: शंकरपूर येथील मदतनीस पदभरती प्रक्रियेत स्थानिक उमेदवार की बाहेरील उमेदवार, यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. नागपूर विभागीय आयुक्त विजयालक्ष्मी बिदरी आणि भंडारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मिलिंदकुमार साळवे यांनी यापूर्वी शंकरपूर येथील स्थानिक उमेदवारच पात्र असल्याचे आदेश दिले होते. मात्र, या आदेशाला आव्हान देत वडेगाव येथील उमेदवार कु. वर्षा लांजेवार यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांनी स्थानिक उमेदवाराच्या निवडीवर आक्षेप घेत याचिका दाखल केली होती.
या प्रकरणाची सुनावणी न्यायमूर्ती प्रफुल्ल एस. खुबाळकर यांच्यासमोर झाली. याचिकाकर्ती कु. वर्षा लांजेवार यांच्या वतीने ॲड. प्रतिक जयंत मेहता व ॲड. अनिस प्रशांत देशपांडे यांनी बाजू मांडली. तर प्रतिवादी म्हणून नागपूर विभागीय आयुक्त, भंडारा मुख्य कार्यकारी अधिकारी व इतरांच्या वतीने ॲड. हर्षिता एच. वर्मा यांच्यासह शासकीय वकिलांनी युक्तिवाद केला. दोन्ही पक्षांची बाजू ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने आपला अंतिम निर्णय राखून ठेवला आहे.
या प्रकरणावर भाष्य करताना स्थानिक उमेदवार शेजल सयाम म्हणाल्या की, “आम्ही विभागीय आयुक्त आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून सर्व आवश्यक पुरावे न्यायालयात सादर केले आहेत. आम्हाला न्यायदेवतेवर पूर्ण विश्वास असून निकाल आमच्याच बाजूने लागेल, याची खात्री आहे.”
शाळा व्यवस्थापन समितीच्या माजी अध्यक्षा रामेश्वरी वाढवे यांनी सांगितले की, “उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमुळे निकालास काहीसा विलंब झाला असावा, मात्र आता नवीन शैक्षणिक सत्र सुरू झाले असल्याने रिक्त पद लवकर भरले जावे, अशी आमची अपेक्षा आहे.”
सामाजिक कार्यकर्ते हेमराज सयाम यांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, “आदिवासी गाव समजून आमच्यावर अन्याय करण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र, देशात लोकशाही असून हुकूमशाही चालणार नाही, हे न्यायालय आपल्या निकालातून स्पष्ट करेल.”
आता न्यायालय या वादावर काय भूमिका घेते आणि शंकरपूरच्या अंगणवाडीला हक्काची मदतनीस मिळते का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.




