– नागपूरातील समर्थन आंदोलनात उत्स्फूर्त सहभाग
कामठी :– दिल्लीच्या जंतर-मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या समर्थनार्थ नागपूर येथिल संविधान चौकात आयोजित करण्यात आलेल्या आंदोलनात कामठी तालुक्यातील विद्यार्थिनींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविला. विविध सामाजिक प्रश्नांवर न्याय मिळावा आणि संबंधित मागण्यांची दखल घेण्यात यावी, या उद्देशाने विद्यार्थिनींनी शांततापूर्ण पद्धतीने आंदोलनात सहभागी होत एकजुटीचा संदेश दिला.
नागपूरमध्ये पार पडलेल्या या आंदोलनात विविध सामाजिक संघटना, विद्यार्थी, युवक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कामठीच्या विद्यार्थिनींनी हातात फलक घेऊन घोषणाबाजी करत आंदोलनाला पाठिंबा दर्शविला. लोकशाही मूल्यांवर विश्वास ठेवत संविधानिक मार्गाने आपली भूमिका मांडणे हीच खरी लोकशाही असल्याचे 11 व्या वर्गातील विद्यार्थिनी शगुण आशिष मेश्राम यांनी यावेळी सांगितले.
या सहभागामुळे सामाजिक आणि राष्ट्रीय प्रश्नांबाबत कामठीतील विद्यार्थिनींची जागरूकता, सामाजिक बांधिलकी आणि लोकशाही प्रक्रियेवरील विश्वास अधोरेखित झाला. विद्यार्थिनींच्या या सहभागाचे विविध स्तरांतून कौतुक होत असून, युवकांनी सामाजिक प्रश्नांबाबत सजग राहण्याचा संदेशही या आंदोलनातून देण्यात आला.




