कामठी :- वयाच्या ६४व्या वर्षीही अन्यायाविरुद्ध लढण्याची जिद्द कायम ठेवत कामठीतील सुगत रामटेके नामक ज्येष्ठ आंदोलनकर्त्याने दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात उपोषणाचे हत्यार उचलले आहे. गेल्या तीन दिवसांपासून ते अन्नत्याग करून आपल्या मागण्यांसाठी शांततापूर्ण आंदोलन करत असून, त्यांच्या चिकाटीची सर्वत्र चर्चा होत आहे.
देशभरातील विविध राज्यांतील आंदोलनकर्त्यांसोबत कामठीचा हा ज्येष्ठ योद्धा देखील आपल्या हक्कांसाठी ठामपणे उभा आहे. वाढते वय, शारीरिक अडचणी आणि प्रतिकूल परिस्थिती यांची पर्वा न करता त्यांनी लोकशाही मार्गाने संघर्षाचा मार्ग स्वीकारला आहे. त्यामुळे कामठीसह नागपूर जिल्ह्यातील नागरिकांकडून त्यांच्या धैर्याचे आणि सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले जात आहे.
आंदोलनस्थळी वैद्यकीय पथकाकडून उपोषणकर्त्यांच्या प्रकृतीवर नियमित लक्ष ठेवण्यात येत असून, मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे.
कामठीतील ज्येष्ठ नागरिकाने दाखविलेली संघर्षाची ही भावना अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, न्याय आणि हक्कांसाठी वय कधीच आड येत नाही, हे त्यांनी आपल्या कृतीतून सिद्ध करून दाखविले आहे.




