spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नवी मुंबई :- सहकाराची नवी क्रांती ‘भारत टॅक्सी’मुळे प्रवासी आणि चालकांसाठी प्रवासाचा नवा अध्याय असून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली देशात सुरू झालेली ही सहकार क्षेत्रातील भारत टॅक्सी मॉडेल संकल्पना प्रवाशांना रास्त भाड्यात सुरक्षित प्रवास देणारी ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रांगणात आज केंद्र व राज्य सरकारच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विशेष सोहळ्यात ‘भारत टॅक्सी’ (BHARAT TAXI) सेवेचा अधिकृत शुभारंभ राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

या सेवा शुभारंभ सोहळयास केंद्रीय राज्यमंत्री (सहकार आणि नागरी विमान वाहतूक, भारत सरकार) मुरलीधर मोहोळ, राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आमदार महेश बालदी, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार मंदाताई म्हात्रे, सहकार व पणन विभागाचे प्रधान सचिव प्रविण दराडे, सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था महाराष्ट्र राज्य दिपक तावरे, नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, नवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. कैलाश शिंदे, बृहन्मुंबई महापालिका आयुक्त अभिजित बांगर, ठाणे महानगर पालिकेचे आयुक्त सौरभ राव, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था, कोकण विभाग आदिनाथ दगडे, रायगड जिल्हाधिकारी किशन जावळे, लोकनेते दि. बा. पाटील स्थानिक प्रकल्पग्रस्त परिवहन सहाकारी संस्थेचे सदस्य रामशेठ ठाकूर, सहकार टॅक्सी को-ऑप. लि. चे चेअरमन डॉ. जयेन मेहता, रुपेश धुमाळे आदि मान्यवर उपस्थित होते.

नवी मुंबई विमानतळावर आगमन होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सह उपस्थित मान्यवरांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयाला पुष्प अर्पण करुन मानवंदना दिली.

या प्रसंगी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ओला आणि उबरसारख्या खासगी ॲग्रीगेटर्सनी आजवर वाहतूक क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिले आहे, मात्र सण-उत्सव किंवा पावसाच्या काळात प्रचंड भाडेवाढ (Dynamic Pricing) करून सर्वसामान्य प्रवाशांची होणारी लूट आणि चालकांवर लादले जाणारे अवाजवी कमिशन या दोन्ही गोष्टींमुळे प्रवासी व चालक दोन्ही अडचणीत येत होते. या पार्श्वभूमीवर भारत टॅक्सीच्या माध्यमातून सहकार क्षेत्राच्या ताकदीवर एक अत्यंत पारदर्शक, सुरक्षित आणि स्वस्त पर्याय उभा राहिला आहे. एकाच मोबाईल ॲपद्वारे कार, ऑटो-रिक्षा आणि बाईक टॅक्सी अशा तिन्ही प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या असून, मध्यस्थांची साखळी मोडीत काढून थेट चालक आणि प्रवाशाला जोडणारी ही क्रांती ठरेल. पहिल्या दीड किलोमीटरसाठी केवळ ३१ रुपये आणि त्यानंतर प्रति किलोमीटर २१ रुपये असा काळी-पिवळी टॅक्सीच्या धर्तीवर निश्चित केलेला सुटसुटीत दर सर्वसामान्यांच्या खिशाला परवडणारा आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.

नवी मुंबई विमानतळ परिसरातील स्थानिक आणि प्रकल्पबाधितांच्या अनुषंगाने बोलताना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले की, या नव्या वाहतूक व्यवस्थेमुळे या भागातील भूमिपुत्रांना आणि तरुणांना रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होणार आहेत. डिजिटल स्वाक्षरीसह राज्य सरकारने ॲग्रीगेटर धोरणाची चौकट आखून दिली असून, संपूर्ण आर्थिक व्यवहारांवर सहकार विभागाचे नियंत्रण असणार आहे. पहिल्या टप्प्यात ६०० टॅक्सींचे अनावरण करण्यात आले असून आगामी काळात १००० पेक्षा जास्त टॅक्सींचा टप्पा गाठण्याचे लक्ष्य ठेवले आहे. मुंबई आणि पुणे या दोन महत्त्वाच्या शहरांमधून या सेवेचा पहिला टप्पा सुरू होत असून, आगामी काळात ही सेवा महाराष्ट्राच्या प्रत्येक कोपऱ्यात पोहोचवून प्रवाशांना अधिक सुरक्षित व सुखद अनुभव देण्याचा संकल्प मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.

केंद्रीय राज्यमंत्री (सहकार आणि नागरी विमान वाहतूक, भारत सरकार) मुरलीधर मोहोळ म्हणाले की, ‘सहकार टॅक्सी’ संस्थेमुळे चालक आता कर्मचारी न राहता थेट सभासद व मालक बनले आहेत. संस्थेच्या नफ्याचा लाभांश (डिव्हिडंड) आता थेट चालकांच्या खात्यात जमा होणार आहे. देशभरातून सुमारे ८ लाख चालक या संस्थेशी जोडले गेले असून, अल्पावधीत ७७ कोटी रुपये कोणत्याही कमिशनशिवाय थेट चालकांच्या बँक खात्यात वर्ग करण्यात आले आहेत. दिल्ली आणि गाझियाबादपाठोपाठ आज मुंबई महानगरात ही सेवा सुरू झाली असून, लवकरच पुणे आणि नागपूर येथेही तिचा विस्तार केला जाईल.

महाराष्ट्रातील सहकाराला बळकटी देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली साखर कारखान्यांना १०,००० कोटी रुपयांची मदत मिळाली असून, संस्थांच्या डिजिटायझेशनसाठी २,००० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ‘सहकारातून समृद्धी’ या अभियानात राज्यातील सर्व चालकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर ‘भारत टॅक्सी’ सेवेच्या शुभारंभप्रसंगी बोलताना राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी, सहकार हे केवळ संस्था चालवण्याचे माध्यम नसून सर्वसामान्य माणसाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचे प्रभावी साधन असल्याचे सांगितले. ‘भारत टॅक्सी’च्या माध्यमातून डिजिटल बुकिंग, पारदर्शक व्यवहार आणि सुरक्षिततेसोबत प्रवाशांना परवडणाऱ्या दरात प्रवास उपलब्ध होणार असून, विमानतळावरून मुंबईत जाणाऱ्या प्रवाशांना या सेवेचा मोठा दिलासा मिळेल. तसेच या उपक्रमामुळे हजारो बेरोजगारांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध होऊन चालकांना सन्मानाचे उत्पन्न मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

या वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाचे कौतुक करत त्यां+नी सांगितले की, सहकार क्षेत्राच्या बळावर राज्याला दारिद्र्यमुक्त करणे आणि देशाला ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे नेणे शक्य होईल. सोबतच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू झालेल्या शेतकरी कर्जमुक्तीच्या महत्त्वपूर्ण निर्णयाचेही त्यांनी स्वागत केले.

यावेळी सहकार टॅक्सी को-ऑप. लि. आणि शासन यांच्यात सामजस्य करार करण्यात आला. तसचे यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सचिन सालुंखे, सीमा संतोष देवगिरीकर, आनंदराव पावस्कर, संतोष सिंग, हितेश मणिलाल दांड या भारत टॅक्सी सारथींना प्रतिनिधीक स्वरुपात शेअर प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले. तसेच अक्षय विठ्ठल कीर्ती, नीरज बळीराम नाईक., तुषार पद्माकर पाटील, दिलीप लक्ष्मण पाटील, विलास कर्वे, सुदर्शन बालकृष्ण म्हात्रे, रोहिदास गायकवाड आणि प्रदीप नारायण म्हात्रे या सारथ्यांना किटचे वाटप करण्यात आले.

भारत टॅक्सी’च्या भव्य शुभारंभाप्रसंगी प्रास्ताविक करताना प्रवीण दराडे यांनी हा उपक्रम ‘सहकारातून समृद्धी’ या राष्ट्रीय संकल्पनेला नवी दिशा देणारे ऐतिहासिक पाऊल असल्याचे सांगितले. पूर्वी केवळ कृषी व दुग्ध व्यवसायापुरता मर्यादित असलेला सहकार आता डिजिटल अर्थव्यवस्था आणि आधुनिक गतिशीलतेच्या (Modern Mobility) क्षेत्रात एक प्रभावी शक्ती म्हणून उदयास येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सूचनेनुसार स्थापन झालेल्या केंद्रीय सहकार मंत्रालय आणि केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह यांच्या दूरदृष्टीमुळे सहकार क्षेत्र ‘आत्मनिर्भर भारत’ घडवण्याचे मुख्य माध्यम बनले आहे. भारत टॅक्सीच्या माध्यमातून तंत्रज्ञान आणि सहकाराचा संगम साधून हजारो लहान व्यावसायिकांना व चालकांना मालकी हक्क, सामाजिक सुरक्षा, प्रतिष्ठा आणि आर्थिक समृद्धीचा नवीन मार्ग प्रशस्त झाला आहे, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.