spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

“खून झालाय, लवकर या!”… मस्करी पडली महागात डायल 112 वर खोटी माहिती देणाऱ्या तरुणावर गुन्हा

पंकज परशुरामकर, इनसाइडर न्युज टुडे नेटवर्क 

नवेगाव बांध :- “खून झालाय, लवकर या!” असा खोटा आपत्कालीन संदेश डायल 112 वर देऊन पोलीस यंत्रणेला वेठीस धरणाऱ्या एका तरुणाविरुद्ध नवेगाव बांध पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 217 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे आपत्कालीन सेवेचा गैरवापर करणाऱ्यांवर पोलीस प्रशासनाने कठोर कारवाईचा इशारा दिला आहे.

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, दि. 22 जुलै 2026 रोजी सायंकाळी 8.20 वाजताच्या सुमारास डायल 112 या आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीवर एका व्यक्तीने खून झाल्याची माहिती दिली. माहिती अत्यंत गंभीर स्वरूपाची असल्याने नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे अधिकारी व मोठा पोलीस फौजफाटा तातडीने घटनास्थळी रवाना झाला.

मात्र, घटनास्थळी पोहोचल्यानंतर कोणतीही खूनाची घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीत संबंधित व्यक्तीने केवळ मस्करी आणि खोडसाळपणातून खोटी माहिती दिल्याचे निष्पन्न झाले.

या प्रकारामुळे पोलीस यंत्रणेचा मौल्यवान वेळ, मनुष्यबळ आणि शासकीय संसाधनांचा विनाकारण अपव्यय झाला. तसेच खऱ्या आपत्कालीन परिस्थितीत मदतीची गरज असलेल्या नागरिकांपर्यंत पोलीस सेवा पोहोचण्यास विलंब होण्याची शक्यता निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.

या प्रकरणी नंदकुमार शामराव उईके (वय 36), रा. माऊली मोहल्ला, नवेगाव बांध यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 217 अंतर्गत नवेगाव बांध पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

नागरिकांना पोलिसांचे आवाहन

नवेगाव बांध पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजित पाटील यांनी नागरिकांना आवाहन करताना सांगितले की, “डायल 112 ही नागरिकांच्या आपत्कालीन मदतीसाठी सुरू करण्यात आलेली अत्यंत महत्त्वाची सेवा आहे. या सेवेवर खोटी, दिशाभूल करणारी किंवा खोडसाळ माहिती देणे हा कायद्याने दंडनीय गुन्हा आहे. अशा प्रकारांमुळे खऱ्या गरजू नागरिकांना मदत मिळण्यास विलंब होऊ शकतो. त्यामुळे डायल 112 चा वापर केवळ वास्तविक आपत्कालीन परिस्थितीतच करावा.”

खोडसाळपणाची किंमत महाग

पोलीस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, आपत्कालीन सेवांचा गैरवापर करणाऱ्या व्यक्तींविरुद्ध भविष्यातही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी जबाबदारीने वागून डायल 112 सारख्या महत्त्वाच्या सेवांचा गैरवापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

Popular Articles