spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ कोकण भवन येथे स्वच्छता मोहिमेतून स्वच्छतेचा संदेश

– मोहिमेस अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग

 नवी मुंबई :- ‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ कोकण भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या स्वच्छता मोहिमेला अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली व अपर आयुक्त फरोग मुकादम यांच्या उपस्थितीमध्ये आज सकाळी स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. कार्यालयीन परिसरातील विविध ठिकाणी स्वच्छता करण्यात आली. परिसरातील अनावश्यक साहित्य, कचरा तसेच अस्वच्छता दूर करून परिसर अधिक स्वच्छ व सुबक ठेवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले. स्वच्छ, सुंदर आणि निरोगी कार्यालयीन परिसर निर्माण करण्यासोबतच स्वच्छतेची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारावी, असा संदेश या उपक्रमातून देण्यात आला.

स्वच्छता ही केवळ एका दिवसाची किंवा मोहिमेपुरती मर्यादित बाब न राहता ती नियमित कार्यालयीन संस्कृतीचा भाग बनली पाहिजे, हा विचार या उपक्रमातून अधोरेखित करण्यात आला. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, नीटनेटका आणि सकारात्मक वातावरणाचा अनुभव मिळावा, यासाठी कार्यालयीन परिसराची नियमित स्वच्छता व देखभाल करण्याचे महत्त्व यावेळी अधोरेखित झाले.

स्वच्छतेसोबत जबाबदारीची जाणीव

शासकीय कार्यालय हे नागरिकांसाठी सेवा देण्याचे महत्त्वाचे केंद्र असल्याने कार्यालयाचा परिसर स्वच्छ आणि सुव्यवस्थित असणे आवश्यक आहे. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालयीन परिसराची स्वच्छता राखण्याबरोबरच नागरिकांमध्येही स्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करण्यासाठी पुढाकार घ्यावा, असा संदेश या मोहिमेतून देण्यात आला.

अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून वृक्षारोपण; पर्यावरण संवर्धनाचा संदेश

‘सेवा संकल्प अभियानांतर्गत’ आयोजित स्वच्छता मोहिमेसोबतच कोकण भवनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. स्वच्छ परिसरासोबतच हिरवाईचे संवर्धन आणि पर्यावरणाचे रक्षण हीदेखील सामूहिक जबाबदारी असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले. अधिकारी-कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्तपणे वृक्षारोपणात सहभाग घेत पर्यावरणपूरक कार्यालयीन परिसर निर्मितीचा संकल्प व्यक्त केला.

यावेळी अपर आयुक्त (सामान्य प्रशासन) फरोग मुकादम, अपर आयुक्त (महसूल) वैशाली इंदानी उंटवानी, उपायुक्त (करमणूक कर), रवींद्र पवार, उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, उपसंचालक (माहिती) संजू चव्हाण, तहसीलदार माधुरी डोंगरे, नायब तहसीलदार, सुरेश रोकडे, लेखाधिकारी दीपक काटे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Popular Articles