– स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांमध्ये दहशत निर्माण करू नये; अखिल भारतीय ग्राहक पंचायतची ठाम मागणी
नागपूर :- राज्यभर सुरू असलेल्या स्मार्ट मीटर बसविण्याच्या मोहिमेबाबत ग्राहकांमध्ये निर्माण झालेल्या संभ्रम आणि भीतीच्या पार्श्वभूमीवर महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांनी महत्त्वपूर्ण स्पष्टीकरण देत स्मार्ट मीटर हे पोस्टपेडच राहतील, ते प्रीपेड करण्यात येणार नाहीत, असे स्पष्ट केले. मात्र, स्मार्ट मीटर बसविताना ग्राहकांना २४ तासांच्या अल्टिमेटमच्या नोटिसा देऊन दहशतीचे वातावरण निर्माण करणे पूर्णपणे अयोग्य असून अशा प्रकारांना तातडीने आळा घालावा, अशी ठाम मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतने केली. ग्राहक पंचायतच्या शिष्टमंडळाने महावितरणच्या मुख्य अभियंता राजेश नाईक यांची भेट घेऊन स्मार्ट मीटर संदर्भातील विविध तक्रारी आणि ग्राहकांच्या भावना त्यांच्यासमोर मांडल्या. यावेळी ग्राहकांना पाठविण्यात येणाऱ्या २४ तासांच्या नोटिसा, त्यातील कारवाईची भाषा आणि वीजपुरवठा खंडित करण्याच्या इशाऱ्यांमुळे ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची बाब निदर्शनास आणून देण्यात आली. अशा प्रकारच्या नोटिसा नियमबाह्य असून त्या तातडीने थांबविण्यात याव्यात, अशी मागणी करण्यात आली. यावर प्रतिक्रिया देताना मुख्य अभियंता नाईक यांनी स्पष्ट केले की, स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांचे मीटर प्रीपेड होणार नाहीत. वीज बिलाची पद्धत पूर्वी प्रमाणेच पोस्टपेड राहणार आहे. स्मार्ट मीटरमुळे ग्राहकांना वीज वापराची आणि बिलाची अद्ययावत माहिती तत्काळ उपलब्ध होईल. त्यामुळे वीज वापरावर नियंत्रण ठेवणे, वीज बचत करणे आणि बिलांबाबत पारदर्शकता वाढण्यास मदत होईल. ते पुढे म्हणाले की, स्मार्ट मीटरमुळे वीज चोरीवर नियंत्रण ठेवण्यास मदत होणार असून, वीज चोरीस प्रोत्साहन देणाऱ्या किंवा सहकार्य करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. ग्राहकांच्या शंका दूर करण्यासाठी महावितरण तर्फे विविध ठिकाणी जनजागृती कार्यक्रम आणि प्रात्यक्षिके आयोजित करण्यात येतील. स्मार्ट मीटर आणि पारंपरिक मीटरमध्ये कोणताही आर्थिक तोटा ग्राहकांना होणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. स्मार्ट मीटर बसविण्याच्या सुरुवातीच्या काळात काही प्रमाणात विरोध होणे स्वाभाविक असले, तरी योग्य माहिती दिल्यानंतर तो कमी होत असल्याचा अनुभव असल्याचे सांगून, ग्राहकांनी अफवांवर विश्वास न ठेवता जनजागृती कार्यक्रमांमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन त्यांनी केले. ग्राहकांनी मागणी केल्यास अशा कार्यक्रमांबाबत महावितरण सकारात्मक निर्णय घेईल, असेही त्यांनी नमूद केले. यावेळी सौरऊर्जा वापरणाऱ्या ग्राहकांनी वीज बचतीकडे अधिक लक्ष द्यावे, घरातील अर्थिंग व्यवस्थित आहे का, वायरिंगमध्ये दोष नाही ना, याची तपासणी करावी. अर्थिंग किंवा वायरिंगमधील दोषांमुळेही वीजबिल वाढू शकते, याकडेही मुख्य अभियंता नाईक यांनी लक्ष वेधले. या शिष्टमंडळात अखिल भारतीय ग्राहक पंचायतचे राष्ट्रीय सदस्य गजानन पांडे, नागपूर शहर कार्याध्यक्ष संजय धर्माधिकारी, नागपूर जिल्हाध्यक्ष गणेश शिरोळे, महानगर सचिव राजू पुरसेटकर, सहसचिव समीर जोशी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. ग्राहक पंचायतने महावितरणला ग्राहकांशी सुसंवाद साधून स्मार्ट मीटर बाबतचे गैरसमज दूर करण्याचे तसेच स्मार्ट मीटर बसविताना कोणत्याही प्रकारची दडपशाही किंवा दहशतीचे वातावरण निर्माण होणार नाही, याची दक्षता घेण्याची मागणी केली आहे.





