नागपूर, ता. २ : गेल्या डिसेंबरमध्ये महानगरपालिकांमध्ये ५ संवर्गासाठी सुरू केलेली भरती प्रक्रिया पूर्ण झाली असून १७७ जणांना नियुक्तीचे आदेश निर्गमित करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेने यावर्षी कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), वृक्ष अधिकारी, नर्स परिचारीका) अशा एकूण 5 संवर्गाकरीता डिसेंबर २०२५ मध्ये जाहीरात प्रसिद्ध केली होती. ही भरती प्रक्रिया अत्यंत पारदर्शक आणि ऑनलाईन पद्धतीने यशस्वीरित्या पूर्ण झाली. कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदाचे एकूण 25 जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक या पदाचे 104, कनिष्ठ अभियंता (विद्युत) या पदाचे 3, वृक्ष अधिकारी या पदाचे 4, नर्स परिचारीका या पदाचे 41 अशी एकूण 177 नियुक्ती आदेश 31 जुलै 2025 रोजी संबंधित उमेदवारांचे पत्त्यावर रजिस्टर पोस्टाद्वारे पाठविण्यांत आले आहेत.
गेल्या काही वर्षात एवढ्या मोठ्या प्रमाणात मनपा तर्फे पहिल्यांदा भरती करण्यात आली आहे. महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ अभिजीत चौधरी यांच्या प्रयत्नामुळे महाराष्ट्र शासनाने भरती करण्याचे निर्देश महानगरपालिकेला दिले आणि यशस्वीरित्या भरती पार पडली.
नागपूर महानगरपालिका तर्फे पदभरती संबंधाने जाहिरात क्र. 804/पी.आर. दिनांक 23/12/2024 अन्वये (कनिष्ठ अभियंता (स्थापत्य), स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, कनिष्ठ अभियंता (विद्युत), वृक्ष अधिकारी, नर्स परिचारीका) अशा एकूण 5 संवर्गाकरीता 245 पदांची जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. तसेच सदर पदाकरीता शासन अधिकृत बाह्य संस्थेमार्फत या पदाकरीता ऑनलाईन स्वरुपात लेखी परिक्षा दिनांक 20 मार्च ते 27 मार्च 2025 या दरम्यान उमेदवाराच्या सोयीच्या दृष्टीने महाराष्ट्रातील 27 शहरात पारदर्शक पध्दतीने घेण्यांत आली होती. परिक्षा केंद्रावर सी.सी.टी.व्ही., जॅमर, पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आलेला होता. तसेच परिक्षेवर नियंत्रण ठेवण्याकरीता नागपूर महानगरपालिकेच्या अधिकारी/कर्मचारी चमु सुद्धा परिक्षा केंद्रावर उपस्थित होते. एकूण ३३२४७ उमेदवारांनी सदर परीक्षा दिली.
परिक्षेत प्राप्त गुणांचे आधारे उमेदवारांची गुणवत्ता यादी मनपाच्या वेबसाईवर प्रकाशित करणेचे पूर्वी उमेदवारांना माहिती करिता त्यांच्या उत्तरतालिका त्यांना कळविण्यांत आल्या तसेच उमेदवारांच्या लेखी परीक्षेत प्राप्त गुणांच्या आधारावर गुणवत्ता यादी तसेच प्रारुप निवड व प्रतिक्षा यादी उमेदवारांकरिता प्रकाशीत करण्यात आली.
प्रारुप निवड व प्रतिक्षा यादीच्या अनुषंगाने संबधीत उमेदवारांना महानगरपालिकेच्या मुख्यालयात 08 जुलै ते 10 जुलै 2025 चे दरम्यान उमेदवारांचे मूळ दस्ताऐवज/प्रमाणपत्रे तपासण्यात आले. याअनुषंगाने उमेदवारांची अंतिम निवड व प्रतिक्षा यादी दि.30.07.2025 रोजी मनपा नागपूर चे अधिकृत संकेत स्थळावर प्रसिध्द करण्यात असून या प्रक्रियेमध्ये निवड यादीतील एकूण २४५ उमेदवारांपैकी 24 उमेदवार गैरहजर होते. तसेच एकूण 44 उमेदवार समांतर आरक्षण मध्ये त्यांचा समावेश असल्याने त्यांचे दस्ताऐवज तपासणी करीता संबंधीत विभागाला पाठविण्यात आले. संबंधीत विभागाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर या उमेदवारांच्या नियुक्तीबाबत प्रक्रिया करण्यात येईल, अशी माहिती सामान्य प्रशासन विभागातर्फे देण्यात आली.
नागपूर महानगरपालिकेच्या इतिहासात सन 2004 नंतर शासनाद्वारे मान्य व अधिकृत बाह्य संस्थेमार्फत शासनाच्या दिलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार व मा.आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली पहिल्यांदाच एवढया मोठया प्रमाणात जाहिरातीची प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबविण्यात आली. त्या बद्दल मा. आयुक्त, मनपा, यांनी या भरतीच्या अनुषंगाने कामे सोपविण्यांत आलेल्या अधिकारी/कर्मचा-यांचे अभिनंदन केले.








