spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

सीवूड्स दारावे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात

– ८६५ नागरिकांनी घेतला शासकीय सेवांचा लाभ

नवी मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वनविभागाच्या धोरणानुसार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून २६ जुलै २०२६ रोजी सीवूड्स दारावे येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे’ अत्यंत यशस्वी आयोजन करण्यात आले. १५१-बेलापूर विधानसभा मतदारसंघांतर्गत सीवूड्स पूर्व, सेक्टर ४२-ए येथील मातृमिलन चर्च सभागृहात आयोजित या विशेष उपक्रमाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद लाभला असून दिवसभरात एकूण ८६५ लाभार्थ्यांना विविध शासकीय प्रमाणपत्रे व सेवांचे वाटप करण्यात आले.

बेलापूर मतदारसंघाच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या हस्ते आणि प्रमुख उपस्थितीत या शिबीराचे उद्घाटन पार पडले. या प्रसंगी भरत जाधव, मुकुंद विश्वासराव यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधींनी शिबीराला प्रत्यक्ष भेट देऊन उपस्थितांशी संवाद साधला व महसूल अभियानाचे महत्त्व विशद केले. तसेच ठाणे जिल्ह्याचे तहसीलदार उमेश पाटील, नायब तहसीलदार गोरख फडतरे, सहाय्यक महसूल अधिकारी जीवन ससाणे, बेलापूरचे मंडळ अधिकारी मोहन बोंबे आणि ग्राम महसूल अधिकाऱ्यांसह विविध शासकीय विभागांचे अधिकारी व कर्मचारी या शिबीरास प्रामुख्याने उपस्थित होते.

राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून आणि ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या नेतृत्वाखाली शासनाचे उपक्रम व विविध दाखले तळागाळातील सामान्य नागरिक, शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांपर्यंत जलद गतीने पोहोचावेत या हेतूने आयोजित या शिबिरात एकाच छताखाली विविध सेवा पुरवण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक लाभ शैक्षणिक व प्रशासकीय दाखल्यांचा झाला असून २७७ नागरिकांना उत्पन्न प्रमाणपत्र, २४३ जणांना वय व अधिवास प्रमाणपत्र (डोमासाईल), १२५ जणांना महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) स्मार्ट कार्ड पास तर ७२ ज्येष्ठ नागरिकांना ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.

तसेच एनएमएमटी बस पासचा २२ जणांनी, ईडब्ल्यूएस (EWS) केंद्राच्या ११ व राज्याच्या २ अशा १३ जणांनी, शिधापत्रिका केवायसी (KYC) चा १० जणांनी आणि रहिवासी दाखल्याचा १० नागरिकांनी लाभ घेतला. आरोग्यविषयक सेवांतर्गत १० जणांना आयुष्मान भारत कार्डचे वाटप करण्यात आले, तर ९ जणांना नॉन-क्रिमीलेअर आणि २ जणांना तीन वर्षाचे उत्पन्न प्रमाणपत्र देण्यात आले.

याशिवाय महसूल प्रशासकीय कामकाजांतर्गत ५२ प्रकरणात निकाली फेरफार करण्यात आले, ६ जणांना जिवंत सातबारा मोहिमेचा लाभ मिळाला, ५ जणांना शेतकरी दाखला आणि १ जणाला जातीचे प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. सामाजिक सुरक्षा योजनेअंतर्गत संजय गांधी निराधार योजनेचे ६ लाभार्थी लाभान्वित झाले, तर २ जणांना आधार नोंदणी व दुरुस्तीची सुविधा आणि २ जणांना इतर सेवांचा लाभ मिळाला.

प्रशासकीय सेवा थेट दारात उपलब्ध झाल्यामुळे स्थानिक रहिवाशांनी समाधान व्यक्त केले. महसूल विभागाचे काम अधिक पारदर्शक, लोकाभिमुख आणि गतिमान करणे हा या समाधान शिबीराचा मुख्य उद्देश असल्याचे सांगत प्रशासनाने हे विशेष जनजागृती अभियान यशस्वीरीत्या पूर्ण केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.