spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

कारगिल विजय दिवस हा आपल्यासाठी राष्ट्रनिष्ठा, शौर्य आणि बलिदानाचा प्रेरणादायी संदेश – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

मुंबई :- कारगिल विजय दिवस हा केवळ लष्करी विजयाचा स्मृतिदिन नसून भारतीय सैनिकांच्या अदम्य शौर्य, त्याग, शिस्त आणि राष्ट्रनिष्ठेचे प्रतीक आहे. या दिवसातून प्रत्येक नागरिकाने ‘राष्ट्र प्रथम’ हा आदर्श आपल्या जीवनात अंगीकारून एकसंघ, सक्षम आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.

लोकभवन येथे सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित कारगिल विजय दिवसानिमित्त वीरसैनिक, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कृतज्ञता सन्मान सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, माजी सैनिकांचे कल्याण मंत्री शंभूराज देसाई, व्हॉईस ॲडमिरल संजय वात्सायन, लेफ्टनंट जनरल डी एस कुशवाह, पोलीस महासंचालक सदानंद दाते, सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे, तिन्ही दलाचे वरिष्ठ अधिकारी तसेच वीर सैनिक, वीरमाता, वीरपत्नी, कुटुंबीय उपस्थित होते.

राज्यपाल वर्मा म्हणाले की, कारगिल युद्धात दुर्गम पर्वतरांगांमध्ये, प्रतिकूल हवामानात आणि शत्रूच्या सततच्या माऱ्यात भारतीय सैनिकांनी दाखविलेल्या पराक्रमामुळे राष्ट्राची अखंडता अबाधित राहिली. भारताच्या सीमा केवळ शस्त्रांच्या बळावर नव्हे, तर सैनिकांच्या अदम्य साहस, शिस्त आणि राष्ट्रप्रेमाच्या बळावर सुरक्षित आहेत, असे त्यांनी नमूद केले.

कारगिलमधील प्रत्येक शहीदामागे एक वीरमाता, वीरनारी आणि राष्ट्रासाठी सर्वोच्च त्याग करणारे कुटुंब उभे आहे. अशा कुटुंबांप्रती संपूर्ण राष्ट्र कृतज्ञ असून त्यांचा सन्मान आणि कल्याणासाठी समाजाने सातत्याने सहभागी व्हावे आणि नव्या पिढीने कारगिल युद्धाचा इतिहास जाणून घेत भारतीय सशस्त्र दलांच्या समर्पणाची जाणीव ठेवावी, असे आवाहन त्यांनी केले.

वीरमाता आणि वीरपत्नींना समर्पित ऐतिहासिक देशभक्तिपर रचनेचे लोकार्पण हा अभिमानाचा क्षण असल्याचे सांगत राज्यपालांनी भारतीय स्थलसेना, नौदल आणि वायुसेनेच्या नेतृत्वासह सर्व सैनिकांच्या राष्ट्ररक्षणातील अतुलनीय योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

कारगिल वीरांचे शौर्य भारताच्या इतिहासात अजरामर; शहिदांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी महाराष्ट्र शासन खंबीरपणे उभे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

कारगिल युद्धातील भारतीय जवानांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत दाखविलेले शौर्य हे जगाच्या युद्धइतिहासातील अतुलनीय उदाहरण असून, भारताचा इतिहास जिवंत असेपर्यंत कारगिलचे वीर अजरामर राहतील, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, कारगिल युद्धात शत्रू उंच पर्वतरांगांवर तळ ठोकून बसला असतानाही भारतीय लष्कर, हवाई दल आणि नौदलाने अद्वितीय समन्वय आणि पराक्रमाचे दर्शन घडवून एक-एक चौकी पुन्हा ताब्यात घेत भारताला ऐतिहासिक विजय मिळवून दिला. गोळीबार, बॉम्बहल्ले आणि अत्यंत कठीण भौगोलिक परिस्थितीची पर्वा न करता भारतीय जवानांनी दाखविलेल्या शौर्याला तोड नाही.

कॅप्टन सौरभ कालिया, कॅप्टन विक्रम बत्रा, कॅप्टन मनोज कुमार पांडे यांसारख्या अधिकाऱ्यांनी मातृभूमीच्या रक्षणासाठी सर्वोच्च बलिदान दिल्याचे स्मरण करून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, देशासाठी प्राणार्पण करणाऱ्या या वीरांचे योगदान भारत कधीही विसरणार नाही. आपल्या वीरांचा सन्मान करणारा समाजच उज्ज्वल भविष्य घडवू शकतो.

ते म्हणाले की, सैन्यातील जवान तर मातृभूमीच्या स्वाभिमानासाठी लढत असतात. त्यामुळे शहीद झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयांना संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी असल्याची जाणीव करून देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे.

मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, 2014 मध्ये मुख्यमंत्री झाल्यानंतर शहीद जवानांच्या कुटुंबीयांना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीत मोठी वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. सुरुवातीला तीन लाख रुपयांवर असलेली मदत टप्प्याटप्प्याने वाढवून 2017 पासून महाराष्ट्रातील प्रत्येक शहीद जवानाच्या कुटुंबाला एक कोटी रुपयांची मदत देण्याचा निर्णय अमलात आणण्यात आला. शहिदांच्या बलिदानाचे मोल पैशात होऊ शकत नसले तरी राज्य शासन त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी कायम उभे राहील, अशी ग्वाही त्यांनी दिली.

भारताने संरक्षण क्षेत्रात आत्मनिर्भरतेकडे मोठी झेप घेतल्याचे सांगताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत आज केवळ शस्त्रास्त्र आयात करणारा देश राहिलेला नसून अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची निर्मिती आणि निर्यात करणारे सक्षम राष्ट्र बनला आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत त्यांनी भारतीय सशस्त्र दलांनी दहशतवाद्यांचे तळ आणि शत्रूची लष्करी ठिकाणे उद्ध्वस्त करून देशाच्या सामरिक सामर्थ्याची जगाला प्रचीती दिली, असे नमूद केले.

राज्याच्या नागरिकांना सुरक्षित वातावरण लाभण्यामागे सीमेवर अहोरात्र देशरक्षण करणाऱ्या सैनिकांचे योगदान असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्री फडणवीस यांनी सर्व शहिदांना विनम्र अभिवादन केले. तसेच वीरसैनिक, वीरपत्नी आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती कृतज्ञता व्यक्त करून महाराष्ट्र शासन भारतीय सशस्त्र दलांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभे राहील, अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली.

वीर माता आणि वीर पत्नींचा त्याग देश कधीही विसरणार नाही – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

कारगिल विजय दिवस हा केवळ युद्धातील विजयाचा उत्सव नसून भारतीय जवानांच्या अदम्य शौर्य, त्याग, समर्पण आणि राष्ट्रभक्तीचे प्रतीक आहे. देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे ऋण 140 कोटी भारतीय कधीही फेडू शकणार नाहीत. शहीद जवानांच्या वीर माता आणि वीर पत्नींचा त्याग हा देशाचा खरा स्वाभिमान असून त्यांचा सन्मान करणे हे संपूर्ण समाजाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.

उपमुख्यमंत्री शिंदे म्हणाले, कारगिल युद्धातील विजयाला 25 वर्षे पूर्ण झाली असली तरी या विजयामागे शूर जवानांचे सर्वोच्च बलिदान आहे. त्यामुळे हा दिवस विजयाचा आनंद देतानाच हुतात्मा जवानांच्या स्मृती जागवणारा आणि भावूक करणारा आहे. देशासाठी शहीद झालेला प्रत्येक सैनिक राष्ट्रप्रेमाची अखंड ज्योत पेटवून गेला आहे. त्यांच्या पश्चात उभ्या राहिलेल्या वीर माता आणि वीर पत्नींचे धैर्य व त्याग हा देशासाठी प्रेरणादायी आहे.

कारगिल युद्धभूमीला भेटीदरम्यान शहीद जवानांनी आपल्या कुटुंबीयांना लिहिलेली पत्रे वाचण्याची संधी मिळाल्याचे सांगताना उपमुख्यमंत्री शिंदे भावूक झाले. त्या पत्रांमध्ये कुटुंबापेक्षा देशाच्या सुरक्षेची चिंता अधिक असल्याचे दिसून आले. अशा वीर सुपुत्रांमुळेच भारताचे सामर्थ्य आणि वैभव अधिक दृढ झाल्याचे त्यांनी सांगितले.

कारगिल युद्धातील शौर्यगाथा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचावी यासाठी महाराष्ट्र शासनाने कारगिल वॉर मेमोरियल येथे लाईट अँड साऊंड शो उभारण्यासाठी 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून त्याचे काम सुरू असल्याची माहिती त्यांनी दिली.

काश्मीरशी महाराष्ट्राचे भावनिक नाते असल्याचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, गेल्या वर्षी महाराष्ट्रातील हजारो युवकांनी काश्मीरमधील लष्करी तळावर जाऊन रक्तदान करून जवानांशी रक्ताचे नाते जोडले. तसेच कुपवाडा येथील 41 राष्ट्रीय रायफल्सच्या कॅम्पमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याचे अनावरण करण्यात आले असून तो देशरक्षणाचा प्रेरणादायी संदेश देत असल्याचे त्यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री शिंदे यांनी ‘ऑपरेशन सिंदूर’चा उल्लेख करत भारतीय सैन्याच्या पराक्रमाचे आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे कौतुक केले. भारताला शांतता हवी असली तरी देशाच्या सार्वभौमत्वावर आघात करणाऱ्यांना भारतीय सेना चोख प्रत्युत्तर देण्यास सक्षम असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

कारगिल विजय दिनानिमित्त वीर सैनिक, वीरमाता व वीरपरिवारांचा सन्मान ही कृतज्ञतेची भावना – उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या वीर जवानांचे शौर्य आणि त्याग हा प्रत्येक भारतीयासाठी प्रेरणादायी असून, वीर सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि दिव्यांग सैनिकांचा सन्मान करणे ही संपूर्ण समाजाची कृतज्ञता व्यक्त करण्याची भावना असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या की, 1999 मध्ये कारगिलच्या दुर्गम आणि प्रतिकूल परिस्थितीत भारतीय सैनिकांनी अतुलनीय शौर्य दाखवत विजय मिळवला आणि हिमालयाच्या उंच शिखरावर तिरंगा फडकावला. हा विजय भारतीय सैन्याच्या अदम्य पराक्रमाचे प्रतीक असून, त्याच्या स्मरणार्थ कारगिल विजय दिन साजरा केला जातो.

त्यांनी सांगितले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा आणि राष्ट्रसेवेचा वारसा महाराष्ट्राला लाभला आहे. देशरक्षणाच्या प्रत्येक प्रसंगी महाराष्ट्राने नेहमीच अग्रस्थानी राहून योगदान दिले असून, कारगिल युद्धात राज्यातील अनेक जवानांनी शौर्य, त्याग आणि देशभक्तीचे सर्वोच्च उदाहरण घालून दिले. मातृभूमीच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेले बलिदान कधीही विसरता येणार नाही.

वीर सैनिकांच्या कुटुंबीयांचा उल्लेख करताना उपमुख्यमंत्री पवार यांनी वीरपत्नी आणि वीरमातांच्या धैर्याला विशेष सलाम केला. आपल्या कुटुंबातील सदस्याला देशसेवेसाठी सीमेवर पाठवताना त्यांनी दाखविलेला त्याग आणि धैर्य संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी असून, त्यांच्या योगदानामुळेच देशातील 140 कोटी नागरिक सुरक्षित असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्य शासन हे माजी सैनिक, वीरपत्नी, वीरमाता आणि दिव्यांग सैनिकांच्या कल्याणासाठी कटिबद्ध असून, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक ते सर्व सहकार्य पुढेही सुरू राहील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी दिली.

या कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय नौदलाच्या बँडचे सादरीकरण, देशभक्तीपर गीत तसेच तिन्ही लष्कर, नौदल व हवाई दलाचे दृकश्राव्य सादरीकरण झाले. तसेच महाराष्ट्रातील कारगिल युद्धातील शौर्य पुरस्कार विजेते, वीरमाता, वीरपत्नी आणि दिव्यांग सैनिक अशा एकूण 39 जणांचा राज्यपालांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. त्यानंतर भारतीय नौदल बँडला रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. तसेच कवी प्रदीप यांच्या देशभक्तीपर रचनेच्या निर्मिती आणि प्रकाशनाशी संबंधित स्वराधीश डॉ. भरत बलवल्ली यांचा गौरव करण्यात आला. त्यानंतर या देशभक्तीपर गीताचे औपचारिक लोकार्पण करण्यात आले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांनी केले.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.