spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

महाआरोग्य शिबिर एक वरदान

आरोग्यम धनसंपदा, असे सुभाषित असले, तरी प्रत्यक्षात आरोग्याकडे दुर्लक्ष हा बहुतांश जणांचा स्थायीभाव असतो. अनेकजण ‘काय होते’, म्हणून आपल्या आरोग्याकडे लक्ष देत नाहीत, तर पैशांअभावी योग्य उपचार मिळू न शकणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे नागपूर येथे आयोजित करण्यात आलेले ‘महाआरोग्य शिबिर’ हे रुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून सूत्रे स्वीकारल्यानंतर ज्या क्षेत्रांमध्ये त्यांनी विशेष लक्ष देण्याचा संकल्प केला, त्यात आरोग्य क्षेत्र एक प्रमुख आहे. गरिबातल्या गरीब माणसाला आरोग्य सुविधा कशा सहज मिळू शकतील, यादृष्टीने त्यांनी केलेल्या प्रयत्नांना यश येऊ लागले आहे. त्यासाठी त्यांनी रुग्णालयांची संख्या वाढविली आणि अस्तित्वात असलेली रुग्णालये अत्याधुनिक केली. दुर्गम भागातील गरीब आदिवासी बांधव उपचारांसाठी मोठ्या शहरांपर्यंत पोहचू शकत नाहीत, म्हणून मग रुग्णालयेच त्यांच्या परिसरात उभारली. गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीत अलीकडेच झालेले स्वतंत्र महिला रुग्णालय हे त्याचेच उत्तम उदाहरण आहे.

नागपूर शहरातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) यांचा कायापालट करून विदर्भच नव्हे तर शेजारील छत्तीसगड, मध्यप्रदेश, तेलंगणा, आंध्रप्रदेश येथील रुग्णांनाही अत्याधुनिक आरोग्य सुविधा मिळण्याची सोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. या साऱ्या उपाययोजनांसोबतच आरोग्याच्या क्षेत्रात आणखी काय- काय करता येईल यादृष्टीने शासनाचे प्रयत्न सुरू आहेत.रविवार दिनांक २६ जुलै २०२६ रोजी नागपुरात झालेले महाआरोग्य शिबिर, हा त्या प्रयत्नांचाच एक भाग होता.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या महाआरोग्य शिबिरामुळे आरोग्याच्या सर्व सुविधा एकाच छताखाली रुग्णांना मिळाल्या. त्याआधी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ५ ते १५ जुलै या काळात मुख्यमंत्री सहायता निधी कक्षातर्फे नागपूर शहरात विविध ठिकाणी ६९ आरोग्य शिबिरे घेण्यात आली. यात ३१,७४० नागरिकांची आरोग्य तपासणी, ४४६३ नागिरकांची रक्त तपासणी व २६४१ नागरिकांचे ‘आभा- आयुष्यमान कार्ड’ तयार करण्यात आले.

या शिबिरांमध्ये जनरल मेडिसीन, बालरोग, स्त्री रोग, कान- नाक- घसा, नेत्ररोग, दंतरोग, शल्यचिकित्सा, अस्थिरोग, हृदयरोग तपासणी, ईसीजी, आभा कार्ड व आयुष्यमान भारत नोंदणी आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. या शिबिरांमध्ये ज्या रुग्णांना एक्सरे, सीटी स्कॅन, एमआरआय, अँजिओग्राफी, नेत्र, रक्त, मुत्र तपासणी इत्यादी चाचण्या व त्यानंतर आवश्यक उपचार, शस्त्रक्रिया शासकीय योजने अंतर्गत निःशुल्क करण्याची कार्यवाही करण्यात आली. त्यानंतर झालेल्या महाआरोग्य शिबिराचा लाभही २० ते २५ हजार रुग्णांनी घेतला. मात्र हे शिबिर केवळ एक दिवसाचे नाही. या शिबिरात ज्यांना गंभीर आजार आढळले, त्यांच्या तपासण्या आणि पुढील उपचारही निःशुल्क केले जाणार आहेत तसेच त्यांच्या औषधांचीही निःशुल्क व्यवस्था करण्यात आली आहे.

गंभीर आजारामुळे अनेकदा कर्जबाजारी होण्याची, कधी घरदार विकण्याची पाळी कित्येकांवर येते, मात्र ही वेळ कुणावरही येऊ नये यासाठी संवेदनशील मुख्यमंत्र्यांनी संकल्प केला आहे. त्यामुळेच नागपुरात झालेले हे महाआरोग्य शिबिर रुग्णांसाठी एक वरदान ठरले आहे.

– अविनाश महालक्ष्मे

Popular Articles