– भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांचा प्रहार
मुंबई :- देशातील प्रत्येक तरुणाच्या रक्तात देशभक्ती भिनलेली आहे आणि इथली तरुणाई पंतप्रधान नरेंद्र मोदीजींसोबत आहे. जनाब संजय राऊत, उबाठा गट आणि मनसेला मात्र विद्यार्थ्यांशी काहीही देणेघेणे नाही. या देशातील तरुणांची माथी भडकावीत आणि इथे नेपाळ, बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण व्हावी, हाच त्यांचा डाव आहे. मात्र त्यांची ही इच्छा कधीही पूर्ण होणार नाही, असा प्रहार भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी मंगळवारी केला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
संसदेतही आम्ही चर्चेला तयार आहोत. संजय राऊत, तुमचे नवीन मालक राहुल गांधी संसदेतील चर्चेपासून पळ काढताहेत. साठ वर्षांमध्ये तुम्हाला कलम 370 हटवता आले नाही ते अमित शाह यांनी हटवले. वंदे मातरम् सक्तीचे करण्यासाठी या देशाला 70 वर्षे लागली. अनेकांनी वंदे मातरमला विरोध केला. भाजपा सरकार आले आणि वंदे मातरम् आता सक्तीचे झाल्यानंतर तुमच्या पोटात दुखायला लागले. कारण तुमची निष्ठा वंदे मातरमशी नाही तर मदरशांसोबत आहे. तुमची निष्ठा भारतासोबत नाही तर पाकिस्तानसोबत आहे. मात्र, कलम 370, वंदे मातरम् किंवा अन्य कायदे अमितभाईंनी अतिशय यशस्वीरित्या मांडले आणि पूर्ण केले, अगदी त्याचपद्धतीने पेपरफुटीचे विधेयकही व्यवस्थित मंजूर होईल, असे बन म्हणाले.
अहंकारापोटीच उद्धव ठाकरे मातोश्रीबाहेर यायचे नाहीत, असे सांगून बन म्हणाले, त्यांच्या अहंकाराची लंका महाराष्ट्रातील जनतेने जाळून टाकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी रोज इन्स्टाग्रामच्या माध्यमातून तरुणांशी संवाद साधत आहेत आणि देशातील हजारो-लाखो विद्यार्थी पंतप्रधान नरेंद्र मोदीना फॉलो करतात. त्यांचे ट्विट ऐकतात, त्यांचे व्हिडिओ पाहतात. संजय राऊत, तुम्ही तुमच्या मालकांची आणि तुमच्या पक्षाची काळजी करा. देशहितासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस अतिशय समर्थ आणि सक्षम आहेत. नीटचे पेपर फोडणाऱ्या मोटेगावकरला अटक करण्यात आली त्याने जाहीर सभेत सांगितले होते की, ‘आम्ही काँग्रेसचे अमित देशमुख यांचे कुंकू लावलेले आहे.’ मग तुम्ही आजपर्यंत अमित देशमुख आणि काँग्रेसला एकतरी प्रश्न विचारला का?
काल रोहित पवारांनी अशीच अफवा उठवत एमपीएससीचा पेपर फुटल्याचे सांगितले. रोहित पवार, जरा डोळे उघडे ठेवून पहा, त्याच विद्यार्थ्यांनी आम्हाला असा कुठलाही आरोप करायचा नव्हता, असे स्पष्ट केले आहे. एमपीएससीच्या अध्यक्षांनीही त्याबद्दल खुलासा केला आहे. देशात राहुल गांधींना खोटे बोलायची सवय लागली, तशी महाराष्ट्रात रोहित पवारांनाही जाणीवपूर्वक खोटे बोलायची सवय लागली आहे. कारण रोहित पवारांना मतदारसंघातील लोकांची कामे करायची नाहीत. देशात नीटच्या आणि विद्यार्थ्यांच्या नावाखाली घुसखोरी करून आंदोलन केले, पोलिसांवर हल्ले केले तसेच एमपीएससीच्या विद्यार्थ्यांच्या नावावर महाराष्ट्रात धुडगूस घालत या सरकारला बदनाम करावे हे रोहित पवार यांचे षडयंत्र यशस्वी होणार नाही. स्वतःची राजकीय पोळी भाजण्यासाठी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा गैरवापर केल्यानंतर आता त्यांनी एमएस-सीईटीच्या विद्यार्थ्यांचाही गैरवापर करायला सुरुवात केली आहे. परंतु, हे सरकार सक्षम आहे. दोषी असतील त्यांच्यावर तातडीने कारवाई केली जाईल, असे बन यांनी स्पष्ट केले.





