– मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक
– १० रस्त्यांवर पथविक्रेते व्यवस्थापनाचा पायलट प्रोजेक्ट
नागपूर :- शहरातील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर मात करण्याकरिता तसेच रस्ते व पदपथ अधिक मोकळे आणि चालण्यासाठी सुरक्षित करण्यासाठी मनपा आयुक्त डॉ. विपिन यांच्या अध्यक्षतेखाली मनपा मुख्यालयात “ऑन-स्ट्रीट पार्किंग आणि पथविक्रेते व्यवस्थापन” या महत्त्वाच्या विषयांवर उच्चस्तरीय आढावा बैठक पार पडली.
बैठकीस नागपूर शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त आदित्य मिरखेलकर, मनपाचे उपायुक्त मंगेश खवले, मुख्य अभियंता लीना उपाध्ये, कार्यकारी अभियंता अल्पना पाटणे यांच्यासह आयटीडीपी इंडिया’, पीडीए पुणे’ आणि आयआरटीई या तज्ज्ञ संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
बैठकीत आयटीडीपी इंडिया’ संस्थेने नागपुरातील ऑन-स्ट्रीट पार्किंग रणनीती आणि झोननिहाय रस्त्यांची निवड यावर पीपीटी सादरीकरण केले. आयुक्त डॉ. विपीन यांनी शहरातील निवडक रस्त्यांची अचूक माहिती गोळा करण्यासाठी तातडीने सल्लागार/सर्व्हेअर नियुक्त करण्याचे निर्देश मनपाच्या प्रकल्प विभागाला दिले आहेत. तसेच पार्किंगच्या नियोजनाबाबत सर्व संबंधित विभागांत समन्वय साधण्यासाठी मनपा अधिकारी, नागपूर वाहतूक पोलीस, नागपूर सुधार प्रन्यास, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महामेट्रो यांच्या उपस्थितीत लवकरच एका विशेष कार्यशाळेचे आयोजन केले जाणार आहे.
तर पीडीए पुणे’ चमूने धरमपेठ झोन, फुटाळा परिसर आणि मेडिकल कॉलेज चौकातील विक्रेता व्यवस्थापनाचे डिझाइन सादर केले. मनपा आयुक्त डॉ. विपीन यांनी धरमपेठ आणि लक्ष्मी नगर परिसरातील १० प्रमुख रस्त्यांची निवड करून तेथे पथविक्रेत्यांच्या शिस्तबद्ध व्यवस्थापनासाठी पायलट प्रोजेक्ट राबविण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच आयआरटीई संस्थेने शहरातील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण, सुधारणा आणि वाहतूक सुलभ करण्यासाठीच्या डिझाइनचे सादरीकरण केले.





