– संत्रा फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान ; आंबिया बहार संत्र्याला गळती !
– नैसर्गिक संकटांमुळे संत्रा उत्पादक शेतकरी हवालदिल !
मोर्शी तालुका प्रतिनिधी :- मोर्शी तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळ १२०० हेक्टर क्षेत्रावर संत्रा उत्पादन घेतल्या जात असून हिवरखेड महसूल मंडळ विक्रमी संत्रा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तालुक्यातील हिवरखेड महसूल मंडळामध्ये 30 जुलै रोजी सकाळी 6 ते 11 वाजेपर्यंत झालेल्या अतिमुसळधार पावसामुळे अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाली असून, संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विशेषतः आंबिया बहार संत्र्याला मोठ्या प्रमाणावर फळगळ सुरू झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.
यावर्षी आधीच वाढता उत्पादन खर्च, रोगराई, हवामानातील सततचे बदल आणि बाजारातील अनिश्चितता यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत असताना या अतिवृष्टीने त्याच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम केले आहे. अनेक ठिकाणी संत्रा बागांमध्ये पाणी साचल्याने झाडांच्या मुळांवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली असून, मोठ्या प्रमाणावर फळांचे नुकसान होण्याचा धोका वाढला आहे.

शेतकऱ्यांनी मोठ्या मेहनतीने जोपासलेल्या आंबिया बहार संत्रा पिकावर आता नैसर्गिक आपत्तीचे संकट कोसळले आहे. अनेक बागांमध्ये फळे गळून पडत असून, लाखो रुपयांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष रुपेश वाळके यांनी महसूल व कृषी विभागाकडे हिवरखेड महसूल मंडळात तातडीने पंचनामे करून संत्रा फळबागांच्या नुकसानीचे विशेष सर्वेक्षण करून वस्तुनिष्ठ अहवाल तयार करावा. प्रभावित शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत जाहीर करावी. पीक विमा व फळपीक विम्याची नुकसानभरपाई त्वरित मंजूर करून वितरित करावी. राज्य सरकारने हिवरखेड महसूल मंडळाला अतिवृष्टीग्रस्त घोषित करून विशेष मदत पॅकेज जाहीर करावे अशी मागणी केली आहे.
शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर वर्षभराची मेहनत वाहून जात असताना प्रशासनाने केवळ कागदी घोडे नाचवू नयेत. महसूल व कृषी विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन पंचनामे पूर्ण करावेत आणि नुकसानभरपाईची प्रक्रिया युद्धपातळीवर राबवावी, अशी जोरदार मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपेश वाळके यांनी केली आहे. जर तात्काळ मदत जाहीर झाली नाही, तर शेतकऱ्यांच्या वतीने तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
“हिवरखेड महसूल मंडळात झालेल्या अतिवृष्टीमुळे संत्रा उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सततच्या व अती मुसळधार पावसामुळे आंबिया बहार संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती सुरू असून, शेतकऱ्यांच्या वर्षभराच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. प्रशासनाने याकडे केवळ नैसर्गिक घटना म्हणून न पाहता शेतकऱ्यांच्या जगण्याचा प्रश्न म्हणून गांभीर्याने पाहिले पाहिजे.
– रुपेश वाळके अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस मोर्शी तालुका





