नागपूर :- एकात्मता नगर, जयताळा येथील एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालयात आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पारंपरिक दिंडी सोहळ्याचे उत्साहपूर्ण आयोजन करण्यात आले यावेळी विद्यार्थ्यांनी वारकरी वेशभूषा परिधान करून टाळ-मृदंगाच्या गजरात, विठ्ठल- रुक्मिणीच्या जयघोषात तसेच अभंग व भजनांच्या सादरीकरणातून आषाढी एकादशीचे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व प्रभावीपणे उलगडून दाखविले. विद्यार्थ्यांच्या उत्साहपूर्ण सहभागामुळे संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध परिश्रम घेतले. त्यांच्या सहकार्यामुळे दिंडी सोहळा शिस्तबद्ध, आनंददायी आणि यशस्वीरीत्या पार पडला. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संत संस्कृती, भक्तीभाव, सामाजिक ऐक्य तसेच भारतीय संस्कृतीतील मूल्यांची ओळख करून देण्यात आली. कार्यक्रमास उपस्थित पालक व नागरिकांनी विद्यार्थ्यांच्या सादरीकरणाचे कौतुक करत शाळेच्या सांस्कृतिक उपक्रमांचे अभिनंदन केले.








