spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते विद्यापीठात वृक्षारोपण

– केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती

– हरित नागपूरच्या दिशेने राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा 1 हजार वृक्ष लागवडीचा संकल्प

नागपूर :- पर्यावरण संवर्धनाचा ठोस संदेश देत हरित नागपूरच्या उभारणीसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने एक हजार वृक्ष लागवडीचा महत्त्वाकांक्षी उपक्रम हाती घेतला आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज राज्यपाल तथा विद्यापीठांचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या हस्ते वृक्षारोपण करून करण्यात आला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनासाठी प्रत्येकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

अंबाझरी मार्गावरील विद्यापीठाच्या जमनालाल बजाज प्रशासकीय भवनाशेजारील खुल्या परिसरात आयोजित या कार्यक्रमात हरित, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक नागपूर घडविण्याचा संकल्प व्यक्त करण्यात आला. वृक्ष लागवड मोहिमेअंतर्गत विद्यापीठ परिसरात विविध देशी प्रजातींच्या एक हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार असून, भविष्यात हा परिसर जैवविविधतेने समृद्ध हरित पट्टा म्हणून विकसित करण्याचा विद्यापीठाचा मानस आहे.

या प्रसंगी शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर, कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, महापौर नीता ठाकरे, आमदार मोहन मते, आमदार प्रवीण दटके, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, उपमहापौर लीलाताई हाथीबेड, महापालिकेच्या स्थायी समिती सभापती शिवानी दाणी, महापालिका पक्षनेते बाल्याभाऊ बोरकर, माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्यासह विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य, अधिसभा व विद्वत परिषदेचे सदस्य, विविध शैक्षणिक विभागांचे प्रमुख, शिक्षक, अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सामान्य प्रशासन विभागाचे सहाय्यक कुलसचिव गणेश कुमकुमवार, उद्यान अधीक्षक प्रवीण गोतमारे, विद्यापीठ अभियंता विनोद इलमे तसेच उद्यान, अभियंता व सामान्य प्रशासन विभागातील कर्मचाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

पर्यावरण संरक्षण, हवामान बदलाच्या आव्हानांना उत्तर आणि भावी पिढ्यांसाठी अधिक हिरवागार परिसर निर्माण करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने हाती घेतलेली ही एक हजार वृक्ष लागवडीची मोहीम हरित नागपूरच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे

Popular Articles