spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पावसाळ्यात आपत्कालीन पथकांची संख्या वाढवा

– आरोग्य सभापती मनीषा अतकरे यांचे निर्देश

नागपूर :- पावसाळ्यात शहरातील पाणी साचणाऱ्या आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असलेल्या ठिकाणी आवश्यक उपाययोजना कराव्यात. तसेच आपत्कालीन पथकांची संख्या वाढवून आवश्यक मनुष्यबळ व यंत्रसामग्री सज्ज ठेवावी, असे निर्देश वैद्यकीय सेवा व आरोग्य विशेष समितीच्या सभापती मनीषा अतकरे यांनी दिले.

शहरातील घनकचरा व्यवस्थापनाच्या अनुषंगाने आढावा बैठक सोमवारी (ता. ३ ऑगस्ट) मनीषा अतकरे यांच्या अध्यक्षतेखाली डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात पार पडली. यावेळी सत्तापक्ष नेते  नरेंद्र (बाल्या) बोरकर, सदस्य रजनी वानखेडे, भावना लोणारे, माजी महापौर दयाशंकर तिवारी, उपायुक्त  राजेश भगत, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले तसेच सर्व झोनचे मुख्य स्वच्छता अधिकारी उपस्थित होते.

पावसाळ्यात शहरातील विविध भागांमध्ये पाणी साचण्याच्या घटना घडत असून, काही ठिकाणी नागरिकांच्या घरांना धोका निर्माण होण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचण्याच्या ठिकाणी मड पंप, आपत्कालीन पथक अथवा इतर यंत्रसामग्रीची आवश्यकता आहे, अशा ठिकाणांची स्वतंत्रपणे नोंद करून आवश्यक व्यवस्था करावी असे निर्देश सभापती श्रीमती मनीषा अतकरे यांनी दिले. तसेच सफाई कामांचे नियोजन करताना संबंधित प्रभागातील नगरसेवकांना सोबत घेऊन पावसाळ्यातील स्वच्छता कार्यक्रम निश्चित करावा. यामुळे कामात सुसूत्रता येण्यासोबतच नगरसेवकांना त्यांच्या प्रभागात सुरू असलेल्या कामांची माहिती मिळण्यास मदत होईल असेही त्यांनी सांगितले. शहरातील पाणी साचणारे ब्लॅक स्पॉट निश्चित करून तेथील खड्डे तातडीने बुजविण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

रस्त्यांवरील कचरा उचलण्यासाठी अतिरिक्त सफाई कामगारांची आवश्यकता असल्याची मागणी समितीच्या सदस्यांनी बैठकीत केली. यावर प्रशासनातर्फे सफाई कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले. ही प्रक्रिया अंतिम टप्प्यात असून, ती पूर्ण झाल्यानंतर प्रत्येक झोनमध्ये आवश्यकतेनुसार अतिरिक्त सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येईल, असे अतकरे यांनी सांगितले.

खुले चेंबर व स्वच्छता व्यवस्थेकडे विशेष लक्ष द्या : नरेंद्र(बाल्या) बोरकर

शहरातील खुले चेंबर तातडीने शोधून त्यांची साफसफाई करून आवश्यक ती दुरुस्ती करावी. तसेच झोननिहाय निविदा प्रस्ताव सादर करावेत. ज्या प्रभागांमध्ये स्वच्छता वाहने उपलब्ध नाहीत, त्या ठिकाणी आवश्यकतेनुसार वाहने उपलब्ध करून द्यावीत असे निर्देश सत्तापक्ष नेते श्री. नरेंद्र (बाल्या) बोरकर यांनी सर्व झोनच्या अधिकाऱ्यांना दिले. स्वच्छता विभागातील निरीक्षक व जमादार यांच्या उपस्थितीची नियमित तपासणी करावी. रात्रीच्या पाळीत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या कर्तव्यावरील उपस्थितीवरही विशेष लक्ष ठेवून शिस्तभंगाच्या घटना आढळल्यास नियमानुसार कारवाई करावी, असे निर्देशही बोरकर यांनी दिले. सफाईच्या कामाची छायाचित्रांसह माहिती संबंधित प्रभागातील नगरसेवकांना बीव्हीजी आणि एजी एन्व्हायरो या संस्थांमार्फत नियमितपणे उपलब्ध करून द्यावी असेही निर्देश देण्यात आले.

ज्या ठिकाणी नाल्यांमध्ये वारंवार कचरा टाकला जातो, अशा ठिकाणी आवश्यकतेनुसार नाल्यांवर जाळ्या बसवाव्यात. तसेच शहरातील धोकादायक ठिकाणे निश्चित करून पावसाळ्यात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना तातडीने कराव्यात अशा सूचनाही अतकरे यांनी बैठकीत दिले.

पोहरा नदी, शक्ती नाला व पिवळी नदीचा आढावा

यावेळी माजी महापौर दयाशंकर तिवारी यांनी शहरातील पोहरा नदी, शक्ती नाला आणि पिवळी नदी यांच्या नालेसफाईच्या कामांचा आढावा घेतला. नाल्यांना ओव्हरफ्लो होण्याची शक्यता लक्षात घेता त्यासाठी आवश्यक पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश त्यांनी दिले. शहरातील ज्या नाल्यांचा प्रवाह रेल्वे मार्गाखालून जातो, अशा ठिकाणी निर्माण होणाऱ्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी मध्य रेल्वेच्या संबंधित अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन आवश्यक कार्यवाही करावी असे निर्देशही तिवारी यांनी दिले.

बैठकीत सर्वप्रथम मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांनी शहरात सुरू असलेल्या नालेसफाईच्या कामाची माहिती दिली. त्यानंतर प्रत्येक झोनच्या स्वच्छता अधिकाऱ्यांनी त्यांच्या कार्यक्षेत्रातील नालेसफाईच्या कामाची सद्यस्थिती व आवश्यक उपाययोजनांची माहिती सादर केली.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.