spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भरधाव पिकअपने घेतले दोन जणांचे बळी – कारंजा-दरव्हा मार्गावर भीषण अपघात, दोन जण गंभीर जखमी

 

कारंजा ४ – रविवारी (ता. ३ ऑगस्ट) सकाळी सुमारे १० वाजता कारंजा-दरव्हा मार्गावर पॉवर हाऊसजवळ भरधाव वेगात असलेल्या पिकअप वाहनाने दोन दुचाकींना जबर धडक दिली. या भीषण अपघातात दोन दुचाकीस्वारांचा जागीच मृत्यू झाला असून, दोघे गंभीर जखमी झाले आहेत. मृतांची नावे नाना जयसिंगपुरे (५६, रा. यशवंत कॉलनी, कारंजा) आणि सुभाष किसन चव्हाण (५५, रा. शिक्षक कॉलनी, कारंजा) अशी आहेत.

अपघात इतका जबरदस्त होता की एक दुचाकी रस्त्याच्या कडेला फेकली गेली, तर दुसरी पूर्णपणे चिरडून गेली. अपघातात जया नाना जयसिंगपुरे (४०, रा. कारंजा) आणि प्रभू माणिक राठोड (४८, रा. कामठवाडा, कारंजा) हे गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्राथमिक उपचारानंतर त्यांना अधिक उपचारासाठी बाहेर पाठविण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच कारंजा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रुग्णवाहिका चालक शंकर रामटेके, रमेश देशमुख आणि शिवम खोंड यांनी तातडीने मदतकार्य करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी यातील दोघांना मृत घोषित केल्याने शहरात शोककळा पसरली आहे.

या अपघातामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, बेफिकीर वाहनचालकांवर नियंत्रण आणण्याची मागणी जोर धरत आहे. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून ठाणेदार शुक्ला यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास सुरू आहे.

एक क्षण, आणि सर्वकाही संपलं!
कारंजा-दरव्हा मार्ग हा वर्दळीचा असून, अनेक वेळा भरधाव वाहनांमुळे अपघात घडतात. आजच्या दुर्घटनेने पुन्हा एकदा सिद्ध केलं आहे की, रस्त्यावर एक छोटासा गाफीलपणा किती महाकाय आपत्ती ठरू शकतो. स्थानिक प्रशासनाने आता तातडीने वेगमर्यादा, सिग्नल यंत्रणा आणि सीसीटीव्ही नियंत्रण लागू करण्याची गरज आहे, अन्यथा अशा दुर्दैवी घटना पुन्हा घडू शकतात.

Popular Articles