spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

दिल्लीच्या व्हीआयपी परिसरात काँग्रेस महिला खासदारासोबत लूटमार; गृहमंत्र्यांना पत्र लिहून तक्रार

 

नवी दिल्ली ४ – राष्ट्रीय राजधानी दिल्लीतील अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या चाणक्यपुरी परिसरात काँग्रेसच्या महिला खासदार आर. सुधा यांच्याशी लूटमार झाली आहे. ही घटना आज सकाळी पोलंड दूतावासाजवळ घडली. मयिलादुथुराई (तामिळनाडू) येथून निवडून आलेल्या खासदार सुधा यांची सोन्याची साखळी अज्ञात चोरट्यांनी हिसकावून घेतली. या घटनेत त्यांना किरकोळ दुखापतही झाली आहे.

खासदार सुधा यांनी या प्रकरणाची माहिती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्राद्वारे दिली असून, व्हीआयपी परिसरात अशा प्रकारच्या घटनेने दिल्लीतील सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी गृहमंत्र्यांना तातडीने गुन्हेगारांना अटक करण्यासाठी पोलिसांना निर्देश देण्याची विनंती केली आहे.

सुरक्षित भागातील घटना, सुरक्षा यंत्रणेत खळबळ

चाणक्यपुरी परिसरात विविध देशांच्या दूतावासांची कार्यालये असून, तो दिल्लीतील सर्वाधिक सुरक्षित क्षेत्रांपैकी एक मानला जातो. याच भागात तामिळनाडू भवनमध्ये वास्तव्य करणाऱ्या खासदार सुधा या सकाळी फेरफटका मारत असताना ही लूटमार झाली. अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यातील सोन्याची साखळी हिसकावली आणि ते तात्काळ पळून गेले.

पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला

दिल्ली पोलिसांनी या घटनेची नोंद घेतली असून, विविध पथके आरोपींचा शोध घेत आहेत. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली असून, प्रत्यक्षदर्शींसोबत संवाद साधून संशयास्पद हालचालींचा मागोवा घेतला जात आहे. या घटनेनंतर तामिळनाडू भवन आणि आसपासच्या परिसरातील सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

पोलिसांकडून तपासाला गती

एक वरिष्ठ पोलिस अधिकारी म्हणाले की, “गुन्हा नोंदवण्यात आला असून तपास सुरू आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. परिसरातील सीसीटीव्ही तपासले जात असून, घटनास्थळाजवळील लोकांशी चौकशी केली जात आहे.”

या घटनेमुळे दिल्लीच्या अतिसंवेदनशील आणि व्हीआयपी भागातील सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

Popular Articles