spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हौतात्म्यांचे रक्त आजही न्यायाच्या मशालीला पेटवतं आहे : जयदीप कवाडे

 
‘पीरिपा’तर्फे नामांतर शहिदांना मानवंदना

नागपूर ५ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी 1978 साली नागपूरच्या रस्त्यांवर सांडलेले जे रक्त होते, ते आज केवळ स्मृती म्हणून जिवंत नाही, तर सामाजिक न्यायाच्या लढ्याला आजही दिशा देतेय, ऊर्जा देतेय. त्या रक्ताने फक्त मातीला ओलावे दिले नाही तर इतिहासाच्या काळजावर एक आक्रोश कोरला.  अन्यायाविरुद्ध आवाज उठणाऱ्या हौतात्म्यांचे रक्त आजही न्यायाच्या मशालीला पेटवतं आहे, अशा धगधगत्या शब्दांत पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीपभाई कवाडे यांनी शहीदांना आदरांजली अर्पण केली.
इंदोरा, दहा नंबर पुलिया येथील नामांतर शहीद स्मारकावर सोमवारी पीरिपा तर्फे आहुती देणाऱ्या भीम सैनिकांना आदरांजली वाहण्यात आली.  अभिवादन सभेच्या प्रारंभी लाँग मार्चचे प्रणेते आणि पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी पुष्पचक्र अपर्ण करून शहिदांना आदरांजली वाहिली. यावेळी सौ. प्रतिमा जयदीप कवाडे (राष्ट्रीय नेत्या, महिला आघाडी), कपिल लिंगायत, विजय पाटील, कैलास बोंबले, दिलीप पाटील, सुमित डोंगरे, डॅनी शामकुंवर, सुचिता कोटांगळे, प्रतिभा मानवटकर, पलाश ठवरे, अंकीत धुपे, रीजवान शेख, स्वप्निल महाल्ले, सुनील कांबळे, शितल बोरकर, सुनील मैश्राम, सुनिता शेंडे, सोपान मानवटकर, अजय वासनिक, रमेश गेडाम, ऋषिकेश राऊत यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी होते.
पुढे बोलतांना जयदीप कवाडे म्हणाले की, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरासाठी विधिमंडळात ठराव मंजूर झाला, आणि त्यानंतर मराठवाड्यात दलितांवर सुरू झालेल्या जातीय हिंसाचाराच्या विरोधात नागपूरने 4 ऑगस्ट 1978 रोजी शांततेत मोर्चा काढला. मात्र इथेच नागपूरने इतिहास घडवला.  कारण या मोर्चावर पोलिसांनी गोळीबार केला. यात रतन लक्ष्मण मेंढे, किशोर बाळकृष्ण माकले, अब्दुल सत्तार बशीर, शब्बीर हुसेन फझल हुसेन आणि अविनाश अर्जुन डोंगरे या पाच तरुणांनी आपले प्राण या लढ्याला अर्पण केले. हा लढा केवळ एका विद्यापीठाच्या नावाचा नव्हता  तो स्वाभिमानाचा, अस्मितेचा आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे हक्काच्या न्यायासाठीचा होता. या पाचही वीरांचे बलिदान म्हणजे समतेसाठी, स्वाभिमानासाठी आणि सामाजिक न्यायासाठी प्राणांची दिलेली आहुती आहे, असेही जयदीप कवाडे यावेळी म्हणाले. यावर्षीही नामांतर शहीद दिनाच्या निमित्ताने, पीपल्स रिपब्लिकन पार्टी, रिपब्लिकन युथ फोर्स, रमाई महिला ब्रिगेड, दलित मुक्ती सेना, राष्ट्रीय मजदूर सेना आणि राष्ट्रीय विद्यार्थी सेना यांच्या संयुक्त विद्यमाने शहीद वीरांना कृतज्ञतेने अभिवादन करण्यात आले. ‘जय भीम’, ‘शहिदांचा विजय असो’, ‘नामांतर आंदोलन जिंदाबाद’ अशा घोषणांनी स्मारक परिसर दुमदुमून गेला.

कार्यकर्ता प्रशिक्षण शिबीराचे यशस्वी आयोजन

आगामी काळात होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा विचार करून पीपल्स रिपब्लिकन पार्टी (पीरिपा) तर्फे सोमवारी रविभवनात कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात कार्यकर्त्यांना पक्षाची भूमिका, निवडणुकीची दिशा, प्रचाराचे नियोजन, व जनतेशी संवादाचे तंत्र या विषयांवर सखोल मार्गदर्शन करण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष व महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) जयदीप (भाई) कवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लाँग मार्चचे प्रणेते व पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. जोगेंद्र कवाडे होते. शहर व ग्रामीण भागातील पक्षाचे सर्व प्रमुख पदाधिकारी, युवक आघाडी, रमाई महिला ब्रिगेड, तसेच विविध आघाड्यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या शिबिरात सहभागी झाले. शिबिरात पक्ष संघटनेच्या मजबुतीसह, स्थानिक पातळीवर प्रभावी प्रचारयंत्रणा उभी करण्याचे तंत्र, सामाजिक प्रश्नांवरील भूमिका, व निवडणूकपूर्व रणनिती यावर सविस्तर चर्चा झाली. प्रशिक्षण शिबिराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करून, त्यांना अधिक सक्षम व सक्रिय करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.

Popular Articles