spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

बल्लारपूर विधानसभेतील सात शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्यस्तरीय सन्मान; हा माझ्यासाठी गौरवाचा क्षण – आ. सुधीर मुनगंटीवार

– राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत जिल्ह्यातील नऊपैकी सात पुरस्कार बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांना

– प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावत शेतकऱ्यांनी राज्याच्या कृषी क्षेत्रात उमटवला बल्लारपूर विधानसभेचा ठसा

चंद्रपूर :- राज्यस्तरावर घेण्यात आलेल्या पीक स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्यातील नऊ शेतकऱ्यांना मिळालेल्या पुरस्कारांपैकी तब्बल सात पुरस्कार हे बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील पोंभूर्णा तालुक्यातील शेतकऱ्यांनी पटकावले आहेत. काही शेतकऱ्यांनी प्रथम, काहींनी द्वितीय तर काहींनी तृतीय क्रमांक मिळवत आपल्या कष्टाची आणि शेतीतील गुणवत्तेची राज्यस्तरावर दखल घ्यायला भाग पाडले आहे. आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या कष्टाला राज्यस्तरीय सन्मान मिळणे हा माझ्यासाठी केवळ आनंदाचा नव्हे, तर गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे, अशी भावना राज्याचे माजी वने व सांस्कृतिक कार्य मंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त करत पुरस्कार प्राप्त नऊ शेतकऱ्यांचे अभिनंदन केले आहेत.

या राज्यस्तरीय यशामध्ये पोंभुर्णा तालुक्यातील चक खापरी येथील सुंदरशहा सोनू जुमनाके, लीलाराम उद्धव पिदुरकर, तुळशीराम भिवाजी मोरे, यशवंत विश्वनाथ काळे, हरिश्चंद्र आनंदऱाव कोडापे, तुळशीराम गोसाई जुमनाके आणि कुसुम आनंदऱाव कोडापे या सात शेतकऱ्यांचा समावेश आहे. यांनी हरभरा आणि जवस या पिकात राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केला असून या सर्वांच्या कष्टाला आणि शेतीतील उल्लेखनीय कामगिरीला राज्याने दिलेली ही पावती संपूर्ण बल्लारपूर विधानसभा मतदारसंघासाठी अभिमानाची बाब आहे.

शेतकऱ्याच्या शेतातील पीक जेव्हा राज्यस्तरावर गौरवले जाते, तेव्हा त्या पुरस्कारामागे केवळ उत्पादनाची गुणवत्ता नसते; त्यामागे त्या शेतकऱ्याचा घाम, कुटुंबाची साथ, अनेक महिन्यांची मेहनत आणि शेतीप्रती असलेली निष्ठा असते. माझ्या मतदारसंघातील सात शेतकऱ्यांनी हे सिद्ध करून दाखवले आहे. त्यामुळे हा सन्मान त्यांच्यासाठी जितका आनंदाचा आहे, तितकाच माझ्यासाठीही गौरवाचा आहे, असे आ. मुनगंटीवार यांनी सांगितले.

बल्लारपूर विधानसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांची ही कामगिरी म्हणजे केवळ पुरस्कारांची संख्या नाही, तर या भागातील शेतीची क्षमता आणि शेतकऱ्यांची गुणवत्ता अधोरेखित करणारी बाब आहे. प्रतिकूल परिस्थितीतही नवनवीन प्रयोग, मेहनत आणि गुणवत्तापूर्ण उत्पादनाच्या माध्यमातून शेतकरी राज्याच्या कृषी क्षेत्रात आपले स्थान निर्माण करत आहेत, ही निश्चितच समाधानाची बाब आहे.राज्यस्तरीय पीक स्पर्धेत यश संपादन करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांचे आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मनःपूर्वक अभिनंदन करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

बल्लारपूर विधानसभेतील शेतकऱ्यांच्या कष्टाला मिळालेला हा सन्मान म्हणजे माझ्या मतदारसंघाच्या शिरपेचात खोवलेला मानाचा तुरा आहे. भविष्यातही शेतकऱ्यांनी अशाच प्रकारे राज्यात आणि देशात बल्लारपूर मतदारसंघाचे नाव उज्ज्वल करावे, यासाठी त्यांच्या पाठीशी सदैव ठामपणे उभा आहो,असा विश्वासही आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.