– विद्यार्थ्यांच्या नृत्याविष्कार व इंग्रजी भाषणांनी उपस्थितांची मने जिंकली
किशोर साहू, मौदा :- जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिखलाबोडी येथे देशाचा ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहपूर्ण व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला. शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रकाश लांजेवार यांच्या अध्यक्षतेखाली ध्वजारोहण करण्यात आले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष मनोजकुमार वंजारी, निहारवाणी ग्रामपंचायत सदस्य रोशन गिऱ्हेपुंजे , व्यवस्थापन समितीचे सदस्य-सदस्या, विविध समित्यांचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, गावातील मान्यवर नागरिक, युवा वर्ग तसेच महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्य दिनानिमित्त शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध देशभक्तीपर नृत्याविष्कार तसेच इंग्रजी भाषणे सादर केली. विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने उपस्थित श्रोते अक्षरशः मंत्रमुग्ध झाले. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना उपस्थित मान्यवरांनी उत्स्फूर्त दाद देत त्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाची प्रस्तावना मुख्याध्यापक रामटेके यांनी केली. त्यांनी स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व, देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे योगदान तसेच विद्यार्थ्यांनी देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी जबाबदार नागरिक म्हणून घडण्याचे आवाहन केले.
यावेळी सामाजिक कार्यकर्त्या कोमल वैरागडे यांनी स्वातंत्र्य चळवळीतील महिलांचे योगदान तसेच वर्तमान काळातील महिलांची सामाजिक, शैक्षणिक व विविध क्षेत्रांतील स्थिती याविषयी प्रभावी मार्गदर्शन केले. महिलांच्या स्वातंत्र्य, समानता व सक्षमीकरणाचे महत्त्व अधोरेखित करत त्यांनी उपस्थितांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या.कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रकाश लांजेवार यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शिक्षणासोबतच संस्कार, शिस्त, देशप्रेम आणि सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे आवाहन केले.
यावेळी ज्येष्ठ नागरिक हरिश्चंद्र लांजेवार यांनी “पूर्वीची शाळा आणि आजची शाळा” या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. पूर्वीच्या काळातील शाळेची परिस्थिती, शिक्षणपद्धती आणि आजच्या आधुनिक शैक्षणिक सुविधांमध्ये झालेला सकारात्मक बदल त्यांनी विद्यार्थ्यांसमोर मांडला. तसेच गावातील पालकांनी आपल्या पाल्यांना गावातील जिल्हा परिषद शाळेतच प्रवेश देऊन शाळेच्या शैक्षणिक विकासाला सहकार्य करावे, असे कळकळीचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आयोजन शाळेतील शिक्षकवृंदाने केले. कार्यक्रमाच्या शेवटी शिक्षिका भाग्यश्री बोरकर यांनी उपस्थित मान्यवर, पालक, ग्रामस्थ, विद्यार्थी व महिला भगिनी यांचे आभार मानले.
विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, ग्रामस्थांची लक्षणीय उपस्थिती आणि देशभक्तीमय वातावरणामुळे चिखलाबोडी येथील स्वातंत्र्य दिन सोहळा उत्साहात व अविस्मरणीय वातावरणात संपन्न झाला.





