खापा, वार्ताहर :- भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त खापा शहरात देशभक्तीपूर्ण वातावरणात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. शासकीय, निमशासकीय कार्यालये तसेच शैक्षणिक संस्थांमध्ये उत्साहात ध्वजारोहण करण्यात आले. महापुरुषांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून स्वातंत्र्यसंग्रामातील शहीदांना अभिवादन करण्यात आले.
खापा शहरातील बाजार चौक येथील महात्मा गांधी पुतळा परिसरात ज्येष्ठ नागरिक मेहबूब शेख यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. राष्ट्रध्वजाला मानवंदना देत उपस्थितांनी देशाच्या स्वातंत्र्याचा अभिमान आणि राष्ट्रभक्तीची भावना व्यक्त केली.
यावेळी नगर काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सुरेश चंद्रवंशी, अशोक दंदे, शमशेर शेख, अफसर (बबलू) शेख, योगेश गोखे, मृणाल हरडे, नगराध्यक्ष पियूष बुरडे, उपाध्यक्ष सुनील पाहुणे, नगरसेवक नामदेव गजभिये, मिलिंद बुरडे, संजय सोनकुसळे, आशिष ढाले, गणेश आके, छगन कवळे, वैशाली लाड, कविता धराळे, मनोरमा श्रियाम, लिला बागडे, प्रेमिला बोकडे (भुते), रवी परतेती, अंजली मेनकुदळे, वैशाली चंद्रकांत लिखार, किशोर आष्टनकर, रोशनी शेखर डेरे, प्रशांत तुमाने, शोभा कारणकर (मानकर), निखिल आष्टनकर, पुष्पेंद्र शर्मा यांच्यासह नगर परिषद कर्मचारी, पोलीस पथक, होमगार्ड, विविध शाळांतील विद्यार्थी-शिक्षक आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत, राष्ट्रीय गीत, राज्यगीत आणि झेंडा गीत सुरेल आवाजात सादर केले. त्यामुळे परिसरात देशभक्तीचा उत्साह निर्माण झाला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रमेश लष्करे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सेवादल अध्यक्ष नारायण लांबट यांनी मानले. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने झालेल्या या कार्यक्रमातून राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि देशप्रेमाचा संदेश देण्यात आला.








