– ‘विद्युत भवन’ येथे ध्वजारोहण व प्रतिमांना माल्यार्पण; मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते मानवंदना
नागपूर :- सत्य, अहिंसा आणि स्वच्छतेचे आजन्म उपासक, राष्ट्रपिता महात्मा गांधी तसेच देशसेवेचे मूर्तिमंत उदाहरण आणि ‘जय जवान, जय किसान’चा अजरामर नारा देणारे भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त महावितरणच्या नागपूर परिमंडळ मुख्यालयात (‘विद्युत भवन’) दोन्ही महान सुपुत्रांना भावपूर्ण व विनम्र अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी महावितरणचे मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या शुभहस्ते राष्ट्रध्वज फडकवून गांधीजींच्या विचारांना आणि त्यांच्या अतुलनीय देशसेवेतील योगदानाला मानवंदना देण्यात आली. याप्रसंगी राष्ट्रभक्ती आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देण्यात आला.
त्यानंतर आयोजित मुख्य अभिवादन कार्यक्रमात मुख्य अभियंता राजेश नाईक यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमांना भावपूर्ण माल्यार्पण करण्यात आले. याप्रसंगी अधीक्षक अभियंते अमित परांजपे, संजय वाकडे व दीपाली माडेलवार, सहायक महाव्यवस्थापक (मानव संसाधन) महेश जाधव, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी सचिन लहाने, वरिष्ठ व्यवस्थापक (वित्त व लेखा) सुधीर टेकाम व प्रशांत ठाकरे यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख, वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.








