– नागपूर शहरातील बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन नियमानुसार कडक कारवाई करण्याचे महापौर श्रीमती निता ठाकरे यांचे निर्देश
नागपूर :- नागपूर शहरातील संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्याविरुद्ध नियमानुसार कारवाई करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत विशेष धाड पथके कार्यान्वित करण्यात आली आहेत. नागरिकांना अधिकृत व सुरक्षित वैद्यकीय सेवा उपलब्ध करून देणे तसेच अनधिकृत वैद्यकीय व्यवसायाला आळा घालण्याच्या उद्देशाने ही मोहीम राबविण्यात येत आहे.
महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत महापौर निता ठाकरे यांच्या उपस्थितीत देण्यात आलेल्या सूचनेनुसार, बोगस डॉक्टरांविरोधात कायदेशीर कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्याकडून मार्गदर्शक सूचना क्र. ७६/२०२५, दि. ५ मे २०२५ अन्वये मनपास्तरीय समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीमध्ये झोनल वैद्यकीय अधिकारी, हिवताप निरीक्षक, औषध निर्माण अधिकारी, पोलीस निरीक्षक/पोलीस पथक तसेच अन्न व औषध प्रशासन विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश करण्यात आला आहे.
मनपाचे अतिरिक्त आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली बोगस डॉक्टरांचा शोध घेण्यासाठी विशेष धाड पथकांची नियुक्ती करण्यात आली असून या पथकांमध्ये संबंधित झोनचे झोनल वैद्यकीय अधिकारी तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे (UPHC) वैद्यकीय अधिकारी यांचा समावेश करण्यात आला आहे. या पथकांमार्फत झोननिहाय संशयित बोगस डॉक्टरांच्या दवाखान्यांची तपासणी करून आवश्यकतेनुसार नियमानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
शासन निर्णयानुसार, शासनमान्य वैद्यकशास्त्रातील पदवी किंवा पदविका धारण केलेली नसलेली तसेच संबंधित वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी नसलेली व्यक्ती वैद्यकीय व्यवसाय करत असल्यास अशा व्यक्तींचा बोगस किंवा अनधिकृत डॉक्टर म्हणून शोध घेण्यात येणार आहे. तसेच शासनमान्य वैद्यकीय पद्धतीव्यतिरिक्त मान्यता नसलेल्या विविध उपचारपद्धतींचा वैद्यकीय व्यवसायासाठी वापर करणाऱ्या व्यक्तींचीही तपासणी करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी संबंधित वैधानिक वैद्यकीय परिषदेकडे नोंदणी असणे आवश्यक आहे. यामध्ये महाराष्ट्र वैद्यकीय परिषद (अॅलोपॅथी), महाराष्ट्र समचिकित्सा परिषद (होमिओपॅथी), महाराष्ट्र चिकित्सा परिषद (आयुर्वेद व युनानी) तसेच महाराष्ट्र दंत वैद्य परिषद (डेंटल) यांच्याकडे संबंधित वैद्यकीय व्यावसायिकांची नोंदणी असणे आवश्यक आहे.
या अनुषंगाने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यक्षेत्रातील संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेण्याबरोबरच नागरिकांकडून प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तातडीने दखल घेऊन आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. झोननिहाय विशेष पथकांमार्फत नियमित तपासणी करून नियमांचे उल्लंघन आढळल्यास संबंधितांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे.
बोगस डॉक्टरांविरोधात नागरिकांनी राज्यस्तरीय तक्रार निवारण कक्षाच्या १०४ क्रमांकावर किंवा जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर यांच्या Chatbot क्रमांक ८६६९४९४९४४ वर तक्रार नोंदवावी. नागरिकांच्या जनजागृतीसाठी याबाबतची माहिती मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांच्या परिसरात प्रदर्शित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
यावेळी मनपाचे महापौर निता ठाकरे यांनी सांगितले की, “ जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार झोननिहाय संशयित बोगस डॉक्टरांचा शोध घेऊन त्यांच्यावर नियमानुसार कडक कारवाई करावी. तसेच नागरिकांनीही अशा व्यक्तींबाबतची माहिती संबंधित यंत्रणेला देऊन प्रशासनास सहकार्य करावे.”





