spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून, अवयव प्रत्यारोपणासाठी ७९८ रुग्णांना १५.७९ कोटींची मदत

मुंबई :- यकृत, मूत्रपिंड, फुप्फुस, हृदय आदी अवयव निकामी झाल्यानंतर अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रिया हाच रुग्णांसाठी शेवटचा पर्याय ठरतो. मात्र या उपचारांसाठी येणारा लाखो रुपयांचा खर्च अनेक कुटुंबांसमोर मोठे आर्थिक आव्हान उभे करतो. या अशा परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी राज्यातील गरजू रुग्णांसाठी आधारवड ठरत असून १ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत अवयव प्रत्यारोपण शस्त्रक्रियेसाठी 798 रुग्णांना 15 कोटी 79 लाख 66 हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली आहे.

वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे आज अवयव प्रत्यारोपणाच्या शस्त्रक्रिया अधिक यशस्वी होत आहेत. त्यामुळे किडनी, यकृत, हृदय आणि फुप्फुस निकामी झालेल्या अनेक रुग्णांसाठी उपचाराची नवी आशा निर्माण झाली आहे. मात्र, अशा शस्त्रक्रियांसाठी खाजगी रूग्णालयात लाखो रुपयांचा खर्च येत असल्याने अनेक गरजू रुग्णांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा कठीण परिस्थितीत मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी गरजू रुग्णांसाठी वरदान ठरत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली आर्थिकदृष्ट्या दुर्बल रुग्णांना वेळेत उपचार मिळावेत, यासाठी मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून आवश्यक आर्थिक मदत उपलब्ध करून दिली जात आहे. त्यामुळे अनेक रुग्णांना नवजीवन मिळत असून, त्यांच्या कुटुंबांनाही मोठा दिलासा मिळत आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची कार्यपद्धती अधिक गतिमान आणि रुग्णकेंद्रित करण्यात आली आहे. वैद्यकीय मदतीसाठी रुग्णांना मंत्रालयात येण्याची आवश्यकता भासू नये, यासाठी राज्यातील सर्व 36 जिल्ह्यांमध्ये जिल्हास्तरीय कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्याचबरोबर, मुख्यमंत्री सहाय्यता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाची अद्ययावत ऑनलाइन प्रणालीही सुरू करण्यात आली आहे. या नव्या प्रणालीमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील रुग्णांना वैद्यकीय मदत अधिक वेगाने उपलब्ध होत आहे. विशेष म्हणजे, मदतीसाठीचा अर्ज आता रुग्णाऐवजी कक्षाशी संलग्न असलेल्या रुग्णालयामार्फत थेट सादर केला जात आहे. त्यामुळे रुग्णांना स्वतंत्रपणे अर्ज करण्याची आवश्यकता राहिली नाही. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता झाल्यानंतर अर्ज मंजुरीची प्रक्रिया तातडीने पूर्ण होत असल्याने गंभीर आजारांवरील उपचारांना गती मिळणार आहे.

१ एप्रिल २०२५ ते ३१ मार्च २०२६ या कालावधीत : १५.७९ कोटींची मदत

मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी ६१७ रुग्णांना १२ कोटी २३ लाख ६६ हजार रुपयांची मदत देण्यात आली.

यकृत प्रत्यारोपणासाठी १६२ रुग्णांना ३ कोटी २१ लाख ५० हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली.

फुप्फुस प्रत्यारोपणासाठी ०३ रूग्णांना ६ लाख रूपयांची मदत देण्यात आली.

तर, हृदय प्रत्यारोपणासाठी १६ रुग्णांना २८ लाख ५० हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.

मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून केवळ आर्थिक मदतच नव्हे, तर उपचारांसाठी लागणारा वेळ कमी करणे, अर्ज प्रक्रियेतील अडथळे दूर करणे आणि गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळणे सोयीचे होणार आहे.

अवयव प्रत्यारोपणासारख्या खर्चिक उपचारांसाठी आर्थिक मदत वेळेत मिळणे अत्यंत महत्त्वाचे असते. संवेदनशील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीच्या माध्यमातून गरजू रुग्णांना तातडीने मदत मिळावी, यासाठी संपूर्ण प्रक्रिया अधिक गतिमान, अद्ययावत करण्यात आली आहे. गरजू रूग्णांनी १८०० १२३ २२११ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.