नागपूर :- सत्यमेव जयते शिक्षण प्रसारक मंडळ, नागपूर द्वारा संचालित एकात्मता उच्च प्राथमिक विद्यालय, एकात्मता नगर, जयताळा, नागपूर येथे १५ ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम उत्साहात व देशभक्तीमय वातावरणात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी विद्यार्थी, शिक्षक, पालक व उपस्थित मान्यवरांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीते, भाषणे व विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून स्वातंत्र्य दिनाचे महत्त्व विशद केले. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण विद्यार्थ्यांनी सादर केलेली लेझीम कवायत ठरली. पारंपरिक वेशभूषेत विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने केलेल्या लेझीम कवायतीने उपस्थितांची मने जिंकली. तालबद्ध हालचाली, उत्कृष्ट समन्वय आणि जोशपूर्ण सादरीकरणामुळे कार्यक्रमस्थळी उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थितांनी विद्यार्थ्यांच्या या सुंदर सादरीकरणाचे टाळ्यांच्या कडकडाटात कौतुक केले विद्यार्थ्यांना लेझीम प्रशिक्षण धनश्री ढेगेकर यांनी दिले. यावेळी विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य, राष्ट्रप्रेम, राष्ट्रीय एकात्मता आणि देशाच्या प्रगतीसाठी जबाबदार नागरिक म्हणून योगदान देण्याचे महत्त्व सांगण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मुख्याध्यापक शरद उरकुडे, शुभांगी कातुरे, सुनीता गावडे, सोनल फुंडे यांनी परिश्रम घेतले. विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग आणि लेझीम कवायतीच्या आकर्षक सादरीकरणामुळे स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम संस्मरणीय ठरला.





