spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून हरित क्रांती घडविण्याचे वसंतराव नाईक यांचे कार्य

– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांचे प्रतिपादन

– कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याचे आवाहन

– हरित क्रांतीचे प्रणेते माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा ४७ वा स्मृतिदिन सोहळा दिमाखात साजरा

– विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार वितरित

– राज्यभरातील प्रगतीशिल शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ व संस्थांचा सत्कार

यवतमाळ :- शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवून राज्यात हरित क्रांती घडविण्याचे कार्य माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी केले, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी केले.

माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांच्या ४७ व्या स्मृतिदिनानिमित्त पुसद येथील बाबासाहेब नाईक अभियांत्रिकी महाविद्यालयातील सुधाकर नाईक प्रेक्षागृहात वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित कृषी गौरव पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते. ॲड. राहुल नार्वेकर यांच्या हस्ते राज्यभरातील प्रगतिशील शेतकरी, कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी संस्थांना ‘वसंतराव नाईक कृषी गौरव पुरस्कार’ प्रदान करून गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला राज्यमंत्री इंद्रनिल नाईक, कुलगुरू डॉ. शरद गडाख, आमदार किसन वानखेडे, माजी आमदार निलय नाईक, अनिता नाईक, नगराध्यक्ष ॲड. मोहिनी नाईक, माजी आमदार ख्वाजा बेग, जिल्हाधिकारी विकास मीना, पोलीस अधीक्षक कुमार चिंता, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मनोज ढगे, कार्याध्यक्ष धनंजय सोनी, वसंतराव घुईखेडकर, आरती फुपाटे यांच्यासह शेतकरी, पुरस्कारार्थी आणि विद्यार्थी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर म्हणाले, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार सोहळा म्हणजे बळीराजाच्या कर्तृत्वाचा गौरव करणारा सोहळा आहे. एकेकाळी देशाला अन्नसुरक्षेसाठी परदेशाकडे पाहावे लागत होते; मात्र आज भारत अन्नधान्याची निर्यात करणारा देश बनला आहे. या परिवर्तनात शेतकऱ्यांचे योगदान मोठे आहे. त्यामुळे देशाच्या पोशिंद्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी अशा कार्यक्रमांना उपस्थित राहणे ही आपली जबाबदारी आहे.

ही वसंतराव नाईकांची भूमी आहे. त्यांनी सत्तेतील माणसाला शेतकऱ्याच्या बांधावर नेले. शेतकऱ्यांना स्वावलंबी करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या दूरदृष्टीमुळे राज्यात चार कृषी विद्यापीठांची निर्मिती झाली. शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीने शेती करण्याचे शिक्षण आणि संशोधनाची दिशा मिळाली, असेही त्यांनी सांगितले.

कृषी क्षेत्रात एआयचा वापर करण्याची गरज

आज अनेक क्षेत्रांत कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ‘एआय’चा वापर सुरू आहे. कृषी क्षेत्रातही एआयचा प्रभावी वापर करून शेतकऱ्यांना त्याचा अधिकाधिक लाभ कसा मिळेल, यासाठी प्रयत्न करण्याची गरज आहे. कृषी क्षेत्रात एआयचा उपयोग भविष्यात शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणार आहे. शेतकऱ्यांनीही आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारून शेती अधिक ज्ञानाधारित करण्याचे आवाहन ॲड. नार्वेकर यांनी केले. विकसित भारताचे स्वप्न साकार करताना शेतकऱ्यांना न विसरता त्यांना केंद्रस्थानी ठेवणे आवश्यक आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे महत्त्वपूर्ण योगदान असून शेतकऱ्यांना पुढे नेल्याशिवाय सर्वांगीण विकास शक्य नाही. कृषी विकासासाठी सातत्याने संशोधन आणि नवतंत्रज्ञानाचा वापर आवश्यक आहे. शेतकरी समृद्ध व्हावा, हे वसंतराव नाईक यांचे स्वप्न होते. ते पूर्ण करण्याचा संकल्प करूया, असे आवाहन त्यांनी केले.

नाईक परिवाराच्या लोकसेवेचा गौरव

नाईक परिवाराने ७५ वर्षांहून अधिक काळ पुसदची सेवा केली आहे. लोकसेवेचा हा वारसा पुढे नेला जात असल्याचा आनंद असल्याचेही ॲड. नार्वेकर यांनी नमूद केले. वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानचा कृषी गौरव पुरस्कार हा समाजोपयोगी, लोकोपयोगी आणि उल्लेखनीय कार्याचा सन्मान करणारा उपक्रम असल्याचे त्यांनी सांगितले.

कृषी विकासात वसंतराव नाईकांचे योगदान मोठे : कुलगुरू डॉ. शरद गडाख

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शरद गडाख यांनी वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याचे कौतुक केले. वसंतराव नाईक यांच्या विचारांची परंपरा प्रतिष्ठानने पुढे सुरू ठेवली आहे. २००३ मध्ये याच प्रतिष्ठानकडून मला उत्कृष्ट शेतकरी पुरस्कार मिळाला होता. त्या पुरस्कारातून मिळालेली प्रेरणा आजही स्फूर्तीदायक आहे, असे त्यांनी सांगितले. वसंतराव नाईक यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महाराष्ट्रात कृषी विकासाला मोठी चालना मिळाली. चार कृषी विद्यापीठांची निर्मिती, महाबीज, रोजगार हमी योजना, ग्रामीण भागातील रोजगारनिर्मिती आणि राज्याला अन्नधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण करण्यासाठी त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. आज देश अन्नधान्याची निर्यात करीत असून कृषी क्षेत्राने मोठी प्रगती केली आहे. या परिवर्तनाच्या वाटचालीत वसंतराव नाईक यांचे योगदान विसरता येणार नाही, असे डॉ. गडाख म्हणाले. यावेळी त्यांनी डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या विविध संशोधन उपक्रमांची आणि कृषी विकासासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती दिली.

पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचे- इंद्रनिल नाईक

प्रास्ताविकात राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी कृषी क्षेत्रात परिश्रम घेवून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या पुरस्कारार्थी शेतकऱ्यांचा इतर शेतकऱ्यांनी आदर्श घेणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. यासोबतच वसंतराव नाईक यांच्या कृषी क्षेत्रातील यांगदानाची व स्मृती प्रतिष्ठानच्या कार्याची माहिती दिली. तसेच जलसंधारण सप्ताह व माजी मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांच्या जन्मदिन २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त महा वॅाकेथॅान वॅाक फॅार वॅाटर चे आयोजन करण्यात आले असून नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन मृद व जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनिल नाईक यांनी केले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. संजय चव्हाण व माधवी गुल्हाणे यांनी केले. आभार प्रमुख मार्गदर्शक प्रा. गोविंद फुके यांनी मानले.

प्रगतीशिल शेतकरी आणि कृषी शास्त्रज्ञांचा सत्कार

कृषी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या प्रगतीशिल शेतकरी व कृषी शास्त्रज्ञ आणि कृषी संस्थांचा विधानसभा अध्यक्ष ॲड राहुल नार्वेकर, कुलगुरु डॅा. शरद गडाख यांच्या हस्ते वसंतराव नाईक कृषी पुरस्कार प्रदान करुन सत्कार करण्यात आला. यात १.संतोष सुधाकर पन्हाळे, (डाळिंब उत्पादक शेतकरी) मु.पो. सात्रळ ता. राहुरी जि. अहिल्यानगर, २. अवंतिका विजय सुकटकर, (शेतकरी व शेतमाल प्रक्रिया लघु उद्योगक) संचालिका, श्रीकृष्ण शेतिमाल प्रक्रिया उद्योग मार्केट यार्ड, पुणे, ३. संगीता वाल्मिक सांगळे, (द्राक्ष उत्पादक व निर्यातदार महिला शेतकरी) मु. सत्यगाव पो. मुंढेड ता. येवला जि. नाशिक, ४. शशांक मुकेश पाटील, (केळी उत्पादक युवा शेतकरी) मु. तांदळवाडी ता. रावेर जि. जळगाव, ५. सुशांत मोहन नाईक, मु.पो. वेतोरे ता. वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग (आंबा, काजू उत्पादन व विक्री), ६. यशोदा वसंतराव कातबने, (फळबाग व इतर पिके) मु. धनगाव पो. ढोरकीन ता. पैठण जि. छत्रपती संभाजीनगर, ७. माऊली गोविंद जाधव, (करडई पीक उत्पादक) मु. सातेफळ पो. अंबासाखर ता. अंबाजोगाई जि. बीड, ८. गोपाल सूर्यमान भकते, (संत्रा उत्पादक शेतकरी) मु.पो. पारडीसिंगा ता. काटोल जि. नागपूर, ९. अशोक शिवरामजी वानखेडे, (ऊस, हळद, सोयाबीन, कापूस, फळ उत्पादक शेतकरी) मु.पो. सुकळी ता. उमरखेड जि. यवतमाळ

कृषी संशोधन संस्था : १०. अशोक कडलग, प्रमुख शास्त्रज्ञ, वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, पुणे कृषी शास्त्रज्ञ : ११. डॉ. बाळकृष्ण महादेव जमदग्नी, (ऊस संशोधक व प्रसार) मु.पो. नरसोबावाडी ता. शिरोळ जि. कोल्हापूर

Popular Articles