-कामठी तालुक्यात पावसाचा खंड; ऐन फुलोऱ्यात आलेल्या पिकाच्या उत्पादनावर परिणामाची भीती
कामठी:- पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने कामठी तालुक्यातील सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. गेल्या काही दिवसांपासून समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील सोयाबीन पिकावर संकटाचे सावट निर्माण झाले असून, ऐन फुलोऱ्याच्या अवस्थेत पावसाने पाठ फिरवल्याने उत्पादन घटण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आता आभाळाकडे लागल्या आहेत.
यंदाच्या खरीप हंगामाच्या सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली. वेळोवेळी झालेल्या पावसामुळे पिकांची वाढही चांगली झाली. मात्र, सध्या सोयाबीन पीक फुलोऱ्याच्या महत्त्वपूर्ण अवस्थेत असताना पावसाने खंड घेतल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. या अवस्थेत पिकाला पुरेसा ओलावा मिळणे अत्यंत गरजेचे आहे.
फुलोऱ्याच्या अवस्थेत पावसाची नितांत गरज
सोयाबीनला फुलोरा येण्याच्या काळात पाऊस झाला तर पिकाला मोठा आधार मिळू शकतो. मात्र पावसाचा खंड आणखी वाढल्यास फुलगळ होण्याची शक्यता असून, त्याचा थेट परिणाम शेंगांच्या संख्येवर आणि परिणामी उत्पादनावर होऊ शकतो. आगामी काही दिवसांत समाधानकारक पाऊस झाला तर सध्याच्या संकटातून पिकांना काही प्रमाणात सावरण्याची संधी मिळेल, अशी आशा शेतकरी व्यक्त करीत आहेत.
कामठी तालुक्यातील अनेक भागांत सोयाबीनची पिके आता फुलोऱ्यात आली असून, काही ठिकाणी शेंगा लागण्यास सुरुवात झाली आहे. मात्र जमिनीतील ओलावा कमी होत चालल्याने पिकांना ताण जाणवू लागला आहे. विशेषतः हलक्या जमिनीतील पिकांवर पावसाच्या खंडाचा परिणाम अधिक जाणवत असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
पावसाच्या प्रत्येक सरीकडे डोळे
सोयाबीनच्या उत्पादनावरच खरीप हंगामातील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित मोठ्या प्रमाणात अवलंबून असते. त्यामुळे सध्याचा पावसाचा खंड शेतकऱ्यांसाठी चिंतेचा विषय ठरत आहे. पाऊस लांबल्यास उत्पादनात घट होऊन आर्थिक फटका बसण्याची भीती आहे. परिणामी, आकाशात ढग दाटून येताच शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित होत असून, पावसाच्या प्रत्येक सरीकडे त्यांचे डोळे लागले आहेत.








