– नगरसेवकांसह कळमना अग्निशमन केंद्राचा पर्यावरणपूरक उपक्रम
नागपूर :- कळमना अग्निशमन केंद्राच्या कार्यक्षेत्रातील मिनीमाता नगर परिसरात झाड पडलेल्या ठिकाणी नवीन वृक्षाची लागवड करण्यात आली. झाड पडल्याने निर्माण झालेली अडचण दूर करण्यासोबतच त्याच ठिकाणी नवीन वृक्ष लावून पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश देण्यात आला.
दि. २८ जुलै २०२६ रोजी न्यू आदर्श मोबाईल सेंटरजवळ, मिनीमाता नगर, नागपूर येथे झाड पडल्याचा कॉल कळमना अग्निशमन केंद्राला प्राप्त झाला होता. माहिती मिळताच अग्निशमन विभागाच्या पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पडलेल्या झाडामुळे परिसरातील नागरिकांची तसेच वाहतुकीची गैरसोय होऊ नये, यासाठी अग्निशमन कर्मचाऱ्यांनी तत्काळ कार्यवाही करत रस्त्यावर पडलेले झाड कापून बाजूला केले होते. त्यामुळे परिसरातील वाहतूक सुरळीत करण्यात आली होती. दरम्यान, ‘एक झाड गेले, तर त्याच्या जागी नवीन झाड उभे करणे’ या पर्यावरणपूरक भावनेतून आज, दि. १९ ऑगस्ट २०२६ रोजी याच ठिकाणी नवीन वृक्षाची लागवड करण्यात आली. झाड पडलेल्या जागेवरच नवीन वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.
या वृक्षारोपण उपक्रमास नगरसेवक प्रदीप पोहाणे, कळमना अग्निशमन केंद्राचे केंद्र अधिकारी अकलीम शेख, कारेमोरे, सफाई कर्मचारी तसेच प्रादेशिक अग्निशमन प्रशिक्षण केंद्र, कळमना येथील प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.
अग्निशमन विभागाकडून आपत्कालीन परिस्थितीत तातडीने मदत व बचावकार्य करण्याबरोबरच पर्यावरण संवर्धनासाठी ही सामाजिक बांधिलकी जपली जात असल्याचे या उपक्रमातून दिसून आले. शहरात वादळी वाऱ्यामुळे किंवा इतर नैसर्गिक कारणांमुळे झाडे पडण्याच्या घटना घडत असतात. अशा वेळी नागरिकांची सुरक्षितता आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी अग्निशमन विभाग तत्परतेने कार्यरत असतो. मात्र, पडलेल्या झाडाची जागा पुन्हा हिरवाईने नटावी, यासाठी नवीन वृक्षारोपण करणे हीदेखील सामूहिक जबाबदारी आहे.
यावेळी उपस्थितांनी नव्याने लावण्यात आलेल्या वृक्षाचे संगोपन करण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्षतोडीमुळे निर्माण होणारी पर्यावरणीय हानी भरून काढण्यासाठी अधिकाधिक वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन करणे गरजेचे आहे. नागरिकांनीही आपल्या परिसरात वृक्षांचे जतन करावे आणि नवीन वृक्षांची लागवड करून त्यांची नियमित देखभाल करावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.





