– ‘महापौर श्रावण उत्सव सोहळ्याला महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
नागपूर :- नागपूर महानगरपालिकेच्या वतीने महिलांच्या दैनंदिन जबाबदाऱ्या आणि व्यस्त जीवनशैलीतून त्यांना आनंदाचे काही क्षण अनुभवता यावेत, आप्तमैत्रिणींसोबत मनमोकळेपणाने वेळ घालवता यावा आणि त्यांच्यातील आत्मविश्वास व सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळावे, या हेतूने ‘महापौर श्रावण उत्सव सोहळा’ मनपातर्फे आयोजित करण्यात आला आहे. त्याअनुषंगाने के. टी. नगर येथील नक्षत्र उद्यानात उत्साहपूर्ण वातावरणात आज (ता. १९) हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महापौर निता ठाकरे यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. श्रावणाच्या निमित्ताने आयोजित या आनंदोत्सवात महिलांनी विविध उपक्रमांमध्ये उत्साहाने सहभाग घेतला. विशेष म्हणजे, मनपाच्या क्रीडा व सांस्कृतिक विभागाच्या वतीने महिलांसाठी प्रथमच अशा स्वरूपाचा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
कार्यक्रमात माजी महापौर दयाशंकर तिवारी, माजी महापौर वसुंधरा मसुरकर, क्रीडा विशेष समिती सभापती दर्शनी धवड,धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, मंगळवारी झोन सभापती सीमा डवरे, गलिच्छ वस्ती सभापती रुतीका मसराम, नगरसेविका साधना बरडे, माधुरी टेकाम, योगिता तेलंग, ममता ठाकूर, पूजा पाठक, वर्षा चौधरी, सरस्वती सलामे, स्नेहल ठाकरे, सुनीता तभाने, माजी नगरसेविका वर्षा ठाकरे, माजी नगरसेविका विनया फडणवीस, प्रगती पाटील, क्रीडा विभागाच्या उज्ज्वला चरडे, कार्यकारी अभियंता सविता गणोरकर यांच्यासह मनपाचे अधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.

माजी महापौर दयाशंकर तिवारी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी बोलताना तिवारी यांनी सांगितले की, महिलांना सन्मानाचे स्थान मिळावे, त्यांच्या सक्षमीकरणाला चालना मिळावी आणि महिलांनी एकत्र येऊन आनंदाचे क्षण अनुभवावेत, या उद्देशाने अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. महिलांच्या चेहऱ्यावर आनंद फुलावा आणि त्यांचा उत्साह द्विगुणित व्हावा, हाच या कार्यक्रमा मागील मुख्य हेतू असल्याचे त्यांनी नमूद केले. यापूर्वीही आपल्या संकल्पनेतून महिलांसाठी अशा स्वरूपाचे विविध उपक्रम राबविण्यात आले असून, त्याच परंपरेत हा श्रावण उत्सव आयोजित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. वर्षभर घर, कुटुंब, मुलं आणि कामाच्या जबाबदाऱ्या समर्थपणे सांभाळणाऱ्या महिलांना काही काळ स्वतःसाठी देता यावा, मनमोकळेपणाने आनंद लुटता यावा आणि मैत्रिणींसोबत उत्सव साजरा करता यावा, यासाठी हा विशेष उपक्रम घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विजेत्यांची नावे
यावेळी महिलांनी विविध कार्यक्रमात सहभाग घेऊन आनंद लुटला. यावेळी श्रावण गीते, फॅशन शो, डान्स , गाणे , मजेशीर खेळ घेण्यात आले. नागपूर महानगरपालिकेद्वारा सहभागी महिलांना भेटवस्तू देण्यात आल्या. कार्यक्रमात श्रावण क्वीन, फुल राणी, तुझी माझी जोडी आणि ‘रंग माझा हिरवा’अशा विविध मनोरंजक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विविध मनोरंजनात्मक उपक्रमांनी कार्यक्रमात रंगत आणली. यावेळी सर्व विजेत्या महिलांना “पैठणी साडी व डिनर सेट” देऊन गौरविण्यात आले. राजश्री बिस्वास, सोनिया बरकी, नेहा त्रिवेदी, महिमा चौधरी या विविध खेळाच्या विजेत्या ठरल्या.

रंग माझा हिरवा स्पर्धेत पूजा दायमा, श्रावण क्वीन भावना, नृत्य स्पर्धेत संजीवनी, श्वेता तिवारी, ज्योती सहारे, भाविका नेवारे यांनी बाजी मारली.





